सुनावणी फक्त ट्रिपल तलाकवर

By admin | Published: May 12, 2017 02:24 AM2017-05-12T02:24:17+5:302017-05-12T02:24:17+5:30

तोंडाने तीन वेळा ‘तलाक’ म्हणून पत्नीला तडकाफडकी घटस्फोट देण्याच्या भारतीय मुस्लीम समाजात प्रचलित असलेल्या प्रथेवर

Hearing only triple divorce | सुनावणी फक्त ट्रिपल तलाकवर

सुनावणी फक्त ट्रिपल तलाकवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : तोंडाने तीन वेळा ‘तलाक’ म्हणून पत्नीला तडकाफडकी घटस्फोट देण्याच्या भारतीय मुस्लीम समाजात प्रचलित असलेल्या प्रथेवर बहुप्रतिक्षित सुनावणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सुरू झाली. आपण फक्त ‘ट्रिपल तलाक’ची घटनात्मक वैधता तपासून तेवढ्यावरच निकाल देऊ, असे खंडपीठाने सुरुवातीलाच स्पष्ट केल्याने याच मुद्द्याशी निगडित अन्य दोन विषय बाजूला पडले.
उन्हाळी सुट्टीत अशी विशेष सुनावणी करण्यासाठी घटनापीठ प्रथमच बसले. फक्त ट्रिपल तलकावरच सुनावणी होईल, असे सरन्यायाधीश न्या. जे. एस. केहर यांनी सुरुवातीसच स्पष्ट केले आणि तेवढ्यापुरताच युक्तिवाद करा, असे वकिलांना सांगितले. त्यामुळे ‘निकाह हलाला’ आणि बहुपत्नी प्रथा या मुस्लीम समाजातील दोन अन्य दोन अनुषंगिक प्रथांची कायदेशीर बाजूही तपासली जाण्याची अपेक्षा संपली.
सरन्यायाधीशांनी सांगितले की, घटनापीठ फक्त ‘ट्रिपल तलाक’ची घटनात्मक वैधता तपासून पाहील. ‘ट्रिपल तलाक’ हा मुस्लिमांच्या धर्माचरणाच्या मूलभूत हक्काचा अविभाज्य भाग आहे, या निष्कर्षाप्रत आम्ही आलो तर तर आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही, असेही सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.
न्या. कुरियन जोसेफ, न्या. रोहिंग्टन नरिमन, न्या. उदय लळित आणि न्या. अब्दुल नझीर हे घटनापीठावरील अन्य न्यायाधीश आहेत. याप्रमाणे आखून दिलेल्या चौकटीत दिवसभर झालेल्या सुनावणीत विविध याचिकाकर्त्यांतर्फे अमित सिंग छड्डा, आनंद ग्रोव्हर आणि इंदिरा जयसिंग या ज्येष्ठ वकिलांचा याच क्रमाने युक्तिवाद झाला. न्यायालयाने ‘अ‍ॅमायकस क्युरी’ म्हणून सहभागी होऊ दिलेले ज्येष्ठ वकील सलमान खुर्शिद यांनी युक्तिवादादरम्यान उपस्थित झालेल्या काही मुद्द्यांवर खुलासावजा भाष्य केले.
न्यायालयाने या सुनावणीसाठी सहा दिवसांचा वेळ आधीच मुक्रर केला आहे. सुरुवातीचे तीन दिवस ‘ट्रिपल तलाक’च्या विरोधात व नंतरचे तीन दिवस बाजूने युक्तिवाद ऐकले जातील. न्यायालयापुढे सुनावणीसाठी एकूण आठ याचिका आहेत.

Web Title: Hearing only triple divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.