निजामुद्दीन दर्ग्यात महिला प्रवेशावर होणार सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 04:27 AM2018-12-08T04:27:44+5:302018-12-08T04:27:53+5:30
हजरत निजामुद्दीन औलिया दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश दिला जावा यासाठी पुण्यातील कायदा शाखेच्या विद्यार्थिनींनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेची पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : येथील हजरत निजामुद्दीन औलिया दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश दिला जावा यासाठी पुण्यातील कायदा शाखेच्या विद्यार्थिनींनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेची पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. महिलांना प्रवेशबंदी असल्याची नोटीस या दर्ग्याबाहेर लावण्यात आली आहे. २७ नोव्हेंबरला या विद्यार्थिनी तिथे गेल्या असता ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याचिकेत म्हटले आहे की, ही प्रवेशबंदी घटनाबाह्य असल्याचे जाहीर करून, दर्ग्यात महिलांना प्रवेश देण्यासाठी केंद्र सरकार, दिल्ली सरकार, दिल्ली पोलीस, दर्ग्याचे विश्वस्त मंडळ यांना योग्य ती पावले उचलण्याचा न्यायालयाने आदेश द्यावा.
>कवाल्यांसाठी प्रसिद्ध
हजरत निजामुद्दीन औलिया हा दिल्लीतील अत्यंत प्रसिद्ध दर्गा असून, तिथे दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. येथे संध्याकाळी कवालीचे होणारे कार्यक्रम देशभरात प्रसिद्ध आहेत. अनेक नामवंत कलाकार या दर्ग्यात आपली कला सादर करायला मिळणे हे भाग्याचे लक्षण समजतात.