हवाई दलाच्या चार जवानांच्या हत्येप्रकरणी फुटीरतावादी यासिन मलिकविरोधात होणार सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 05:02 PM2019-09-11T17:02:08+5:302019-09-11T17:05:07+5:30
सध्या तिहारमधील कारागृहात बंद असलेल्या यासिन मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता.
नवी दिल्ली - हवाई दलाच्या चार जवानांच्या केलेल्या हत्येप्रकरणी काश्मीर खोऱ्यातील फुटीरतावादी नेते यासिन मलिक यांच्याविरोधात १ ऑक्टोबरपासून टाडा कोर्टात सुनावणीस सुरुवात होणार आहे. त्यामुळे सध्या तिहारमधील कारागृहात बंद असलेल्या यासिन मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
सुमारे ३० वर्षांपूर्वी २५ जानेवारी १९९० रोजी स्क्वॉड्रन लीडर रवी खन्ना आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांची श्रीनगरच्या बाहेरील भागात हत्या करण्यात आली होती. रावलपोरा येथे झालेल्या या हत्याकांडासाठी यासिन मलिक यांच्या दहशतवाद्यांना जबाबदार धरण्यात आले होते. हवाई दलाच्या जवानांवर घातक हल्ला करण्याचे कारस्थान रचण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्यान, जम्मू येथील टाडा न्यायालयाने मलिक यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करून ११ सप्टेंबरपर्यंत त्यांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते.
२५ जानेवारी १९९० रोजी झालेल्या त्या दहशतवादी हल्ल्यावेळी स्क्वॉड्रन लीडर खन्ना यांनी कारमधून आलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यापासून आपल्या सहकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दहशतवाद्यांनी अत्याधुनिक शस्रास्रांद्वारे केलेल्या हल्ल्यात खन्ना यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचाही मृत्यू झाला होता.
दरम्यान, जम्मू काश्मीर हायकोर्टाच्या एकेरी खंडपीठाने १९९५ मध्ये श्रीनगरमध्ये टाडा न्यायालय नसल्याचा हवाला देत मलिक यांच्याविरोधात खटल्याची सुनावणी करण्यास स्थगिती दिली होती. त्यानंतर २००८ मध्ये यासिन मलिक यांनी अमरनाथ यात्रेवरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जीवितास धोका असल्याचे सांगत या प्रकरणाची सुनावणी श्रीनगरमध्येच घेण्यात यावी अशी मागणी विशेष न्यायालयासमोर केली होती. अखेर यावर्षी २६ एप्रिल रोजी जम्मू काश्मीर हायकोर्टाने एकेरी खंडपीठाने दोन खटल्यांची सुनावणी श्रीनगरला वर्ग करण्याच्या २००८ रोजी दिलेला निर्णय रद्द केला होता.