हृदयविकारावरील ICMR चा अहवाल दोन महिन्यात येईल, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 08:50 AM2023-03-30T08:50:20+5:302023-03-30T08:50:54+5:30
Heart Attack : आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या संसदीय समितीने आयसीएमआरला याची कारणे शोधून हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूंबाबतचा अहवाल तयार करण्यास सांगितले होते.
नवी दिल्ली : कोरोना महामारीनंतर देशात हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूंमध्ये मोठी वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही हे मान्य करत यावर संशोधन सुरू असल्याचे सांगितले. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चला (ICMR) या संदर्भात संशोधन करण्याचे आदेश दिले होते, जे तीन-चार महिन्यांपासून करण्यात आले आहे आणि दोन महिन्यांत अहवाल येईल, असे मनसुख मांडविया यांनी सांगितले.
एका मीडिया संस्थेच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, आमच्याकडे लसीकरण आणि कमॉर्बिटी (एकापेक्षा जास्त आजारांनी ग्रस्त रुग्ण) यांचा डेटा आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूच्या उपलब्ध आकडेवारीवर संशोधन करत आहे. त्यानंतरच आपल्याला काही ठोस माहिती समजू शकेल.
कोरोनानंतर हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ
आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या संसदीय समितीने आयसीएमआरला याची कारणे शोधून हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूंबाबतचा अहवाल तयार करण्यास सांगितले होते. या समितीचे नेतृत्व राज्यसभा खासदार भुवनेश्वर कलिता करत आहेत. त्यांनी सांगितले की, अद्याप कोणताही ठोस पुरावा नाही, ज्याच्या आधारे असे म्हणता येईल की, मृत्यू प्रत्यक्षात कोरोना लसीमुळे होत आहेत. परंतु कोरोनानंतरच असे मृत्यू वाढले आहेत.
हृदयविकाराच्या तक्रारींशी संबंधित रुग्णांची संख्या वाढली
कोरोना महामारीनंतर हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यात निरोगी लोक अचानक खाली पडून मृत्यूमुखी पडल्याचे दिसून आले. सोशल मीडियावर समोर आलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये 24 वर्षीय व्यक्तीचा जिम करत असताना मृत्यू झाल्याचे दिसत होते. तसेच, कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये पडून सचिन नावाच्या इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू झाला होता. तर एका उत्सवात एक व्यक्ती नाचत असताना अचानक खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. मीडिया रिपोर्टनुसार, हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या तक्रारींशी संबंधित रुग्णांची संख्या 10-15 टक्के वाढली आहे.