२ भावांच्या मृत्यूची ह्दयस्पर्शी कहाणी; एकाच दिवशी दोघांनी सोडले प्राण, कुटुंबावर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 05:31 PM2022-02-02T17:31:03+5:302022-02-02T17:31:36+5:30
डांगराली गावात रावताराम आणि हिराराम यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे
सिरोही – राजस्थानच्या सिरोहीमध्ये एक ह्द्रयद्रावक घटना घडली आहे. जी ऐकून अनेकांच्या डोळ्यात नकळत पाणी आले. याठिकाणी एकाच दिवशी दोन भाऊ मृत्यूवेळीही एकत्रच गेले. सध्या या दोन भावांच्या प्रेमाची चर्चा परिसरात सगळीकडे पसरली आहे. इतकचं नाही तर सोशल मीडियातही व्हायरल होत आहे. दोन भावांमधील हे प्रेमाचं नातं आणि अखेरच्या काळातही साथ न सोडणं याबद्दल लोकांना कौतुक वाटत आहे. नेमकं काय घडलं याबाबत आपण जाणून घेऊया.
राजस्थानच्या सिरोही येथील डांगराली गावात दोन वृद्ध भावांचा रावताराम आणि हिराराम देवासी यांना देवाज्ञा झाली. या दोघांचा जन्म भलेही काही वर्षाच्या अंतराने झाला असेल परंतु हे भाऊ आयुष्यभर एकत्रच राहिले. दोघांचं लग्नही एकाच दिवशी झालं त्याचसोबत या दोघांनी एकाच दिवशी जगाचा अखेरचा निरोप घेतला. रावताराम आणि हिराराम अखेरच्या श्वासही १५-२० मिनिटांच्या अंतराने घेतला. जन्मापासून आयुष्यभर या दोन भावांनी इतकी साथ निभावली की अनेकजण त्यांच्या नात्याचं उदाहरण देत होते.
डांगराली गावात रावताराम आणि हिराराम यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घरातील दोन वृद्ध व्यक्ती एकाच वेळी मृत्युमुखी पडले. आता रावताराम यांचा मोठा मुलगा भिकाजी यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली आहे. भिकाजीवर पिता रावताराम आणि काका हिराराम यांनी संपत्ती सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे. दोन्ही कुटुंबात एकूण ११ भाऊ बहिणी आहेत.
मृत्यूच्या एक दिवस आधी काय घडलं?
भिकाजी यांनी मृत्यूपूर्वीचा किस्सा सांगताना भावूक झाले. ते म्हणाले की, वडील रावताराम आणि हिराराम यांच्या प्रेमाचे, भाऊबंदकीचे किस्से परिसरात प्रसिद्ध होते. आजही रावताराम आणि हिराराम एकाच दिवशी अशाप्रकारे कुटुंबाला सोडून गेले यावर विश्वास बसत नाही. मागील काही दिवसांपासून काका हिराराम अस्वस्थ होते. परंतु माझे वडील रावताराम एकदम निरोगी होते. २८ जानेवारीला सकाळपासून वडिलांनी काहीच खाल्ले नाही असं भिकाजीने सांगितले.
जेव्हा आईला कळालं वडिलांनी काही खाल्लं नाही तेव्हा तिने वडिलांना खाण्याचा आग्रह धरला. आईच्या सांगण्यावरुन वडिलांनी बिस्किट खाल्ले आणि काकाच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर ते झोपले आणि पुन्हा उठलेच नाही. २९ जानेवारीला सकाळी ८ ते ९ दरम्यान वडिलांनी प्राण त्याग केला. तर दुसरीकडे हिराराम काकांना थंडी वाजायला लागली म्हणून बाहेर उन्हात काही वेळ झोपवले तेव्हा काही क्षणातच हिराराम यांनीही प्राण सोडला.