ह्रदयद्रावक... केबीसीत लाखो जिंकणाऱ्या डॉ. दीपा शर्माचा दरड दुर्घटनेत मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 08:06 PM2021-07-26T20:06:25+5:302021-07-26T20:11:17+5:30
राजस्थानमधील सिकर येथील तीन जणांचा मृत्यू झाला असून 34 वर्षीय डॉ. दीपा शर्मां यांनीही या दुर्घटनेत आपला जीव गमावला आहे. दीपा शर्मा ह्या लेखिका होत्या, त्यांनी पंचकर्म विषयात आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं होतं.
जयपूर - हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात भूस्खलनामुळे नऊ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. किन्नौर जिल्ह्यात बटसेरीच्या गुंसा जवळ छितकुलहून सांगलाकडे जाणारी पर्यटकांची गाडी भूस्खलनात सापडली. यात गाडीवर मोठ-मोठे दगड पडून नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये, एका नेव्ही अधिकाऱ्याचा समावेश असून राजस्थानच्या सिकर येथील तिघांनी आपला जीव गमावला आहे. त्यामध्ये, 2013 साली कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी झालेल्या डॉ. दीपा शर्माचेही निधन झाले आहे.
राजस्थानमधील सिकर येथील तीन जणांचा मृत्यू झाला असून 34 वर्षीय डॉ. दीपा शर्मां यांनीही या दुर्घटनेत आपला जीव गमावला आहे. दीपा शर्मा ह्या लेखिका होत्या, त्यांनी पंचकर्म विषयात आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं होतं. दीपा यांनी विज्ञान शाखेतून क्लिनीकल न्यूट्रीशनिस्ट आणि डाएटेटीक्स विषयात आपली पदवी पूर्ण केली होती. सोशल मीडियावरही त्या खूप अक्टीव्ह होत्या, म्हणूनच ट्विटरवर त्यांचे 20 हजार फॉलोअर्स आहेत.
दीपा यांनी कौन बनेगा करोडपतीच्या 7 व्या सिझनमध्ये 2013 साली सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये, 6.40 लाख रुपयेही जिंकले होते. दीपा यांचा मोठा भाऊ महाराष्ट्रातील विद्युत वितरण विभागात इंजिनिअर आहे. तर, लहान बहिण संध्या बंगळुरू येथे वास्तव्यास आहे. दीपा यांच्या हिमाचल प्रदेशातील पिकनीक टूरपूर्वीच त्यांची आई लहान बहिणीकडे बंगळुरूला राहण्यास गेली होती. दीपाचे वडिल रामभरोसे शर्मा हे मूळचे करौली जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. दीपा राहत असलेल्या शांतीनगर येथील शेजाऱ्यांनी दीपाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. दीपा ही अतिशय चांगली मुलगी होती, कोरोना काळात अनेकांना तिने मदत केल्याचंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
नेव्ही लेफ्टनंटचाही मृत्यू
भूस्खलनामुळे गावासाठी बास्पा नदीवर तयार करण्यात आलेला कोरोडो पूलही तुटला आहे. यामुळे गावाचा संपर्कही तुटला आहे. दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. त्यामध्ये, 9 जणांचा मृत्यू झाला असून 4 राजस्थानचे, दोन छत्तीसगढचे एक दिल्ली आणि एक महाराष्ट्राचा रहिवाशी आहे. तर, एकाची अद्याप ओळख पटली नाही. मृतांमध्ये नेव्हीतील लेफ्टनंट अमोघ बापट यांचा मृत्यू झाला आहे. अमोघचे कुटुंब छत्तीसगडमध्ये वास्तव्याला असून त्याचं पोस्टिंग अंदमान-निकोबार बेटांवर होतं.