हृदयद्रावक! गरिबीमुळे मजुराचा मृतदेह गावी नेता न आल्याने कुटुंबाने प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून केले अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 04:06 PM2020-04-21T16:06:50+5:302020-04-21T16:06:58+5:30
लॉकडाऊनमुळे अनेकांना आपल्या निकटवर्तीयांच्या सुख-दुःखात सहभागी होणे अशक्य झाले आहे. दरम्यान, असाच एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे.
नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र जवळपास गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले लॉकडाऊन गोरगरीबांसाठी दुहेरी संकट ठरत आहे. लॉकडाऊनमुळे अनेक मजूर विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. तर अनेकांना आपल्या निकटवर्तीयांच्या सुख-दुःखात सहभागी होणे अशक्य झाले आहे. दरम्यान, असाच एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. कांजण्या होऊन दिल्लीतमृत्यू झालेल्या एका मजुराचा मृतदेह गावी आणता न आल्याने त्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्याची वेळ कुटुंबीयांवर आली.
हा प्रकार उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यात घडला. येथील सुनील मजूर दिल्लीत मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, 37 वर्षीय सुनीलचा कांजण्या होऊन मृत्यू झाला. मात्र प्रचंड गरिबीमुळे त्याच्या कुटुंबाला त्याचा मृतदेह गावी आणण्याची व्यवस्था करता आली नाही. त्यामुळे अखेरीस त्याच्या कुटुंबाने प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
याबाबत सुनीलची पत्नी पूनम हिने सांगितले की, सुरुवातीला आम्ही सुनीलचा मृतदेह परत आणण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण ते शक्य झाले नाही. त्यानंतर गावच्या सरपंचांना सांगून आम्ही दिल्ली पोलिसांना फोन करून त्यांच्यावर दिल्लीतच अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली. माझी लहान मुले आहेत. सध्या रेल्वे बंद आहेत. खासगी गाडीचे भाडे परवडणारे नाही. लॉकडाऊन आणि आर्थिक अडचणीमुळे आम्ही मृतदेह आणण्यासाठी दिल्लीत येऊ शकत नाही, असे मी पोलिसांना सांगितले.'
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी सुनीलवरच्या अंत्यसंस्काराची औपचारिकता पूर्ण केलेली नाही. अंत्यसंस्कारासाठी कुटुंबियांकडून उत्तर प्रदेश सरकारच्या परवानगीची वाट ते पाहत आहेत. आता सुनीलच्या पत्नीने परवानगी पत्रावर सह्या केल्या असून, हा अर्ज लवकरच दिल्ली पोलिसांपर्यंत पोहोचेल असे त्याच्या गावाच्या सरपंचाने सांगितले.