ह्रदयद्रावक... आधी पत्नी, नंतर आई अन् आता मुलाचेही निधन, वडिलांवर दु:खाचा डोंगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 17:09 IST2023-01-19T17:07:57+5:302023-01-19T17:09:58+5:30
बुधवारी कॉलेजला जाण्यासाठी वरदान आपल्या घरातून बाहेर पडला, त्याचवेळेस त्याचा मित्र रोहित बाईक घेऊन आला.

ह्रदयद्रावक... आधी पत्नी, नंतर आई अन् आता मुलाचेही निधन, वडिलांवर दु:खाचा डोंगर
उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील कोयलानगर येथे बुधवारी सकाळी मित्रांसोबत कॉलेज जाणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू झाला. ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात वरदान या १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी आहेत. पोलिसांनी ट्रकचालकास अटक केली आहे. हरीश दुग्गल हे डिफेन्स सप्लायर कंपनीत एच आर विभागात काम करतात. हरीश यांचा एकुलता एक मुलगा वरदान दुग्गल हा बी फार्मासीचे शिक्षण घेत होता.
बुधवारी कॉलेजला जाण्यासाठी वरदान आपल्या घरातून बाहेर पडला, त्याचवेळेस त्याचा मित्र रोहित बाईक घेऊन आला. त्यामुळे, वरदान त्याच्या बाईकवर बसला. या बाईकवरुन तिघे मित्र प्रवास करत होते. दरम्यान, कोयलानगर हायवेवर पाठीमागून आलेल्या गॅस सिलेंडरच्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. त्यामध्ये, डोक्याला गंभीर जखम झाल्याने वरदानचा मृत्यू झाला. वरदानचे मित्र रोहित आणि सुशांत हेही जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे वरदान हा दररोज कॉलेजला जाताना टॅक्सी किंवा ऑटोने जात. मात्र, बुधवारी तो मित्राच्या बाईकवर बसून कॉलेजला निघाला होता.
एकुलता एक मुलगा वरदानच्या मृत्युने हरीश दुग्गल यांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या मुलाचा मृतदेह पाहून त्यांच्या तोंडातून निघणारे शब्द ऐकून अनेकांचे डोळे पाणावले. अगोदर पत्नी, नंतर आई आणि आता मुलगाही गेला... मी एकटाच राहिलोय... कुणाच्या सहाऱ्याने जगू.. अशी आर्त हाक हरीश दुग्गल यांनी दिली. वडिलांचा हा आक्रोश ह्रदय पिळवून टाकणारा होता. एकुलता एक तरुण मुलगा गमावल्याने दुग्गल कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.
दरम्यान, हरीश यांची पत्नी म्हणजेच वरदानच्या आईचे दोन वर्षांपूर्वी कोरोना काळात निधन झाले होते. तर, १५ दिवसांपूर्वीच त्यांची आई बीना दुग्गल यांचे कर्करोगाने निधन झाले. या दुर्घटनांमुळे दुग्गल कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून आता घरात केवळ हरीश दुग्गल आणि त्यांचे वडिल बालकिशन हे दोघेच आहेत.