ह्रदय पिळवटून टाकणारी घटना! मुलाने आयुष्य संपवलं, आईवडिलांनी डोळे केले दान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 13:37 IST2025-01-18T13:37:20+5:302025-01-18T13:37:56+5:30
नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात कोटा शहरात तब्बल चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील एका विद्यार्थ्याने शनिवारी आयुष्य संपवलं.

ह्रदय पिळवटून टाकणारी घटना! मुलाने आयुष्य संपवलं, आईवडिलांनी डोळे केले दान
तो जेईई परीक्षेची तयारी करण्यासाठी कोटामध्ये आला होता. कोटामध्ये आजीसोबत राहायचा. शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आणि सगळ्यांनाच धक्का बसला. मनन जैन असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, त्यांच्या आत्महत्येमुळे आईवडिलांवर मोठा आघात झाला आहे. मननचे डोळे दान करण्याचा निर्णय त्याच्या आईवडिलांनी घेतला.
कोटा शहरातील जवाहर नगर पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली. पोलीस अधिकारी राम लक्ष्मण गुर्जर यांनी सांगितले की, "मनन बुंदी जिल्ह्यातील इंदरगढचा रहिवाशी होता. तो मागील तीन वर्षांपासून त्यांच्या मावस भावसोबत आजीच्या घरी राहत होता. तो जेईई परीक्षेची तयारी करत होता."
"तो अभ्यासात हुशार होता. पण, त्याने आत्महत्या का केली, याचे कारण कळू शकले नाही. आम्ही त्याचा मृतदेह एमबीएस रुग्णालयातील शव विभागात ठेवला आहे. त्याचे कुटुंबीय आल्यानंतर त्याच्याकडे सोपवला जाईल", असे गुर्जर म्हणाले.
मननचे मामा महावीर जैन यांनी सांगितले की, "मननचे वडील मनिष जैन हे इंदरगढमध्ये मोबाईलचे काम करतात. तो मावसभावासह आजीच्या घरात राहत होता. हे घडण्यापूर्वी एक दिवस आधीच त्याचं घरी बोलणं झालं होतं. पण, आज त्याने फोन उचलला नाही, त्यामुळे आम्हाला चिंता वाटू लागली. आम्ही जेव्हा घरी जाऊन बघितले, तेव्हा त्याने आत्महत्या केली होती."
मनन जैनचे डोळे दान; आईवडिलांनी घेतला निर्णय
मननच्या आईवडिलांनी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला. ते मृतदेह घेऊन बुंदीला निघून गेले. महावीर जैन यांनी सांगितले की, ममनचे डोळे मात्र दान करण्यात आले आहेत. जेणेकरून त्याच्या डोळ्याने दुसऱ्या कुणाला हे जग बघता यावं.
गेल्या १८ दिवसात कोटामध्ये चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. पोलीस आणि प्रशासनाकडून विविध उपाययोजना करूनही आत्महत्यांचे हे सत्र अजूनही थांबलेले नाही.