ह्रदयद्रावक... थंडीपासून बचावासाठी केला उपाय, चिमुकलीसह कुटंबातील ३ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 12:42 PM2023-01-10T12:42:32+5:302023-01-10T12:43:31+5:30
चुरू जिल्ह्यातील रतनगढ पोलीस ठाणे हद्दीतील गौरीसर गावात ही घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे
चुरु - राजस्थानच्या चरु जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी करण्यात आलेली युक्ती जीवघेणी ठरली आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संबंधित कुटुंबाने घरात शेगडीत कोळसा टाकून शेकोटी केली होती. या शेकोटीमुळे खोलीत उब निर्माण झाली. मात्र, घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद असल्याने शेकोटीचा धूर घरातच राहिला. त्यामुळे, जीव गुदमरुन घरातील दोन महिला आणि एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. सकाळी इतर सदस्य झोपेतून उठल्यानंतर त्यांना तात्काळ सुखरुप स्थळी हलवण्यात आले.
चुरू जिल्ह्यातील रतनगढ पोलीस ठाणे हद्दीतील गौरीसर गावात ही घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे. गौरीसर निवासी अमरचंद प्रजापत यांचे कुटुंब शेतात घर करुन राहते. अमरचंद यांचे दोन्ही मुले राजकुमार आणि केदार हे कामानिमित्त गुजरातमध्येच असतात. त्यामुळे, घरी अमरचंद, त्यांची पत्नी सोना देवी, सून गायत्री, ५ वर्षांचा नातू कमल, अडीच वर्षाची नात तेजस्वीनी आणि तीन महिन्यांचा नातू खुशी हे राहत होते. दुर्दैवाने घरात पेटवलेल्या शेकोटीच्या धुरामुळे जीव गुदमरुन कुटुंबातील सोनादेवी, गायत्री आणि चिमुकल्या तेजस्वीनीचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सोमवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर, ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी, घरातील महिलांना सका ळी आवाज दिला होता, पण कुणीही प्रत्युत्तर दिले नाही, त्यामुळे, स्थानिकांनी घराचे दरवाजे आणि खिडक्या तोडल्यानंतर संबधित घटनेचा उलगडा झाला.
दरम्यान, जानेवारी महिना सुरु होताच कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात परिसर गारटला असून लोकांकडून थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर, मफलर, उब देणारा पोशाख आणि शेकोटी करण्यात येत असल्याचेही दिसून येते. राजस्थानच्या चारु जिल्ह्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी कुटुंबाने घरात शेगडीत जाळ लावला होता. मात्र, थंडीपासून बचावाचा हा मार्ग जीवेघेणा ठरला आहे.