भावनिक! डीसीपी झालेल्या मुलीला वडिलांनीच केले सॅल्यूट; पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
By देवेश फडके | Published: January 4, 2021 05:07 PM2021-01-04T17:07:09+5:302021-01-04T17:11:13+5:30
पोलिस दलात मंडळ निरीक्षक पदावर असलेल्या एका पित्याने पोलिस उपअधीक्षक झालेल्या मुलीला सर्वांच्या समोर सॅल्यूट केला. या भावनिक क्षणाचा फोटो आंध्र प्रदेश पोलिसांकडून ट्विट करण्यात आला आहे.
तिरुपती : माणसाच्या आयुष्यात अनेक भावनिक क्षण येत असतात. आपल्या लेकरांनी गाठलेले यशोशिखर पाहून आई-वडिलांना अत्यानंद होत असतो. अशीच एका घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आंध्र प्रदेशपोलिस दलात मंडळ निरीक्षक पदावर असलेल्या एका पित्याने पोलिस उपअधीक्षक झालेल्या मुलीला सर्वांच्या समोर सॅल्यूट केला.
आंध्र प्रदेश पोलिसांकडून हा भावनिक क्षण ट्विटरच्या माध्यमातून शेअर करण्यात आला आहे. यानंतर हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याचे समजते. मंडळ निरीक्षक असलेल्या श्याम सुंदर यांची मुलगी येंदलुरु जेसी प्रसनती ही गुंटूर जिल्ह्याची पोलिस उपअधीक्षक म्हणून रुजू झाली आहे. ०४ जानेवारी ते ०७ जानेवारी या कालावधीत तिरुपती येथे होत असलेल्या आंध्र प्रदेश पोलिस दलाच्या मेळाव्याप्रसंगी या दोघांची भेट झाली. उपअधीक्षक असलेली मुलगी समोर येताच वडिलांनी चक्क सर्वांसमोर तिला सॅल्यूट केले. या भावनिक क्षणाचे साक्षीदार झालेल्या सर्व पोलिसांचे डोळे अक्षरशः पाणावले.
#APPolice1stDutyMeet brings a family together!
— Andhra Pradesh Police (@APPOLICE100) January 3, 2021
Circle Inspector Shyam Sundar salutes his own daughter Jessi Prasanti who is a Deputy Superintendent of Police with pride and respect at #IGNITE which is being conducted at #Tirupati.
A rare & heartwarming sight indeed!#DutyMeetpic.twitter.com/5r7EUfnbzB
पोलिसांच्या मेळाव्याप्रसंगी ड्युटीवर असताना प्रथमच आम्ही दोघे एकमेकांसमोर आलो. जेव्हा त्यांनी मला सँल्युट केला, तेव्हा मला अवघडल्यासारखे वाटत होते. काही झाले तरी, शेवटी ते माझे वडील आहेत. मला सॅल्यूट करू नका, असे मी त्यांना सांगितले. मात्र, त्यांनी सॅल्यूट केला. मग मीदेखील त्यांना सॅल्यूट केला, अशी प्रतिक्रिया डीसीपी जेसी यांनी दिली. वडिलांसाठीही हा क्षण अभिमानास्पद असाच होता.
माझे वडील हे माझ्यासाठी नेहमीच प्रेरणास्रोत राहिलेले आहेत. वडिलांना अथकपणे जनतेची सेवा करताना मी कायम पाहिले आहे. हे पाहतच मी मोठी झाली आहे. मिळेल त्या सर्व मार्गांनी त्यांनी लोकांना मदतच केली आहे. त्यामुळेच मीदेखील पोलिस दलाची निवड केली. पोलिस विभागाकडे पाहण्याचा माझा अत्यंत सकारत्मक दृष्टीकोन आहे, असेही त्या म्हणाल्या. जेसी या २०१८ च्या तुकडीतील डीएसपी आहे.