'अती उकाडा आणि अज्ञानी स्टाफमुळे झाला VVPATमध्ये बिघाड'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2018 01:19 PM2018-06-08T13:19:28+5:302018-06-08T13:19:28+5:30
व्हीव्हीपॅट मशिन्सला जास्त प्रकाशापासून वाचवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
नवी दिल्ली- अती उकाडा व अज्ञानी स्टाफमुळे गोंदिया आणि कैराना जागेसाठी झालेल्या मतदानाच्या वेळी व्हीव्हीपॅट मशिनमध्ये बिघाड झाल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिलं आहे. व्हीव्हीपॅट मशिन्सला जास्त प्रकाशापासून वाचवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या मशिन्स नव्याने तयार करण्यात आल्या आहेत, त्या मशिनला अती उजेडापासून दूर ठेवणं गरजेचं आहे, असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिलं आहे. 28 मे रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत काही मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशिनमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या. उत्तर प्रदेशातील कैराना आणि महाराष्ट्राच्या गोंदियामधील मतदानावेळी व्हीव्हीपॅट मशिनमध्ये बिघाड झाला होता. त्यावेळी कैरानामध्ये 20.8 टक्के आणि गोंदियामध्ये 19.22 व्हीव्हीपॅट बदलावे लागले.
व्हीव्हीपॅट मशिनमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर निवडणुक आयोगाने त्यासंदर्भातील तपास केला. ज्या मशिन पहिल्यांदाच वापरात आल्या त्याच मशिनमध्ये बिघाड झाल्याचं निरिक्षण निवडणूक आयोगाने नोंदवलं आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार, पोटनिवडणुकीदरम्यान जवळपास 4 हजार नव्या व्हीव्हीपॅट मशिन्स वापरण्यात आल्या. यापैकी जास्त मशिन्स अती उकाड्यात ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे मशिन्समध्ये बिघाड झाला. मशिन बनविणाऱ्या कंपनीने आधीच याबद्दल सांगितलं असल्याचंही समोर येत आहे.
कमिटीने दिलेल्या अहवालात म्हटलं आहे की, व्हीव्हीपॅट मशिन्सची देखभाल करण्याची जबाबदारी ज्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती ते कर्माचारी अज्ञानी होते. त्या कर्मचाऱ्यांना मशिन्सबद्दल काहीही माहिती नव्हती. त्या कर्मचाऱ्यांनी मशिन्स अती प्रकाशात आणि उकाड्यात ठेववल्या ज्यामुळे मशिन्स खराब झाल्या. पोटनिवडणुकीदरम्यान खराब झालेल्या सर्व मशिनची तांत्रिकदृष्ट्या तपासणी केली जाणार असल्याचं म्हटलं आहे.