पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 04:20 AM2024-04-30T04:20:43+5:302024-04-30T04:20:55+5:30
विदर्भातील १० जिल्हे ४० अंशांच्या पुढे : सोमवारी गोंदिया वगळता विदर्भातील १० जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंशांच्या वर पोहचले.
नवी दिल्ली : देशभरात सतत वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, प. बंगालसह दक्षिणेकडील कर्नाटक, केरळ आदी राज्यांतही तापमान उच्चांक गाठत आहे. दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यावर असलेले वादळी पावसाचे सावट आता संपले असून पारा चढणार आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसा उन्हाचे चटके, उष्णता व रात्री उकाड्याचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचा भाग, तेलंगणा, तामिळनाडू, पुदु्च्चेरी या भागात पुढील तीन ते चार दिवस वाढती उष्णता लक्षात घेता 'ऑरेंज' अलर्ट जारी केला.
विदर्भातील १० जिल्हे ४० अंशांच्या पुढे : सोमवारी गोंदिया वगळता विदर्भातील १० जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंशांच्या वर पोहचले. नागपूर २४ तासात २.७ अंशांनी वाढून ४०.१ अंशांवर गेले आहे. अकोला येथे ४२.३ अंश तापमान नोंदविण्यात आले. रात्रीच्या तापमानात अंशत: घट झाली असून ३० एप्रिलपासून पुढे त्यात वाढ होण्याचा अंदाज आहे.