जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 10:01 PM2024-05-31T22:01:14+5:302024-05-31T22:02:43+5:30
यूपी-बिहारमध्ये गेल्या 24 तासात 22 कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
Heat Wave Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी उद्या, म्हणजेच 1 जून रोजी मतदान होत आहे. या टप्प्यात एकूण 57 जागांवर मतदान होणार आहे, ज्यात उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 13 आणि बिहारमधील 8 जागांचा समावेश आहे. यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज असून, अधिकारी आपापल्या बूथकडे रवाना झाले आहेत. पण, अशातच कडक उन्हाळ्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तर गेल्या 24 तासांत एकूण 22 जणांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेसातील मिर्झापूर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी तीन कर्मचाऱ्यांसह सहा होमगार्ड जवानांचा मृत्यू झाला, तर 17 जवान रुग्णालयात दाखल आहेत. सोनभद्र जिल्ह्यातदेखील तीन मतदान कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, बिहारमध्ये उन्हाने 10 मतदान कर्मचाऱ्यांचा जीव घेतला. या सर्वांचा मृत्यू कसा झाला याबाबत डॉक्टरांनी अद्याप काहीही सांगितले नसले तरी उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या यूपी, बिहार, झारखंड, राजस्थान, दिल्ली आणि मध्य प्रदेशसह इतर अनेक राज्ये प्रचंड उष्णतेची लाट आहे. सकाळी सुरू झालेली उष्णतेची लाट अगदी संध्याकाळ आणि रात्रीदेखील जाणवत आहे. निवडणूक आयोगाने मतदानाची सर्व तयारी पूर्ण केली असली तरी 45 ते 48 अंश कडक उन्हात कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहान करावा लागत आहे. सध्या प्रशासनाने सर्वांना उन्हापासून वाचण्यासाठी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तसेच, प्रशासनाकडूनही योग्य ती पाऊले उचलली जात आहेत.