जूनच्या तिसऱ्या आठवड्यात गरमी वाढल्याने विजेची मागणीही वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 03:09 AM2020-06-21T03:09:01+5:302020-06-21T03:09:15+5:30
विजेच्या मागणीतील घसरण कमी होऊन ९.७६ टक्क्यांवर आली आहे. आदल्या सप्ताहात ही घसरण १0.५ टक्क्यांवर होती.
नवी दिल्ली : जूनच्या तिस-या आठवड्यात गरमी वाढल्यामुळे देशातील विजेची मागणी काही प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे विजेच्या मागणीतील घसरण कमी होऊन ९.७६ टक्क्यांवर आली आहे. आदल्या सप्ताहात ही घसरण १0.५ टक्क्यांवर होती. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. त्याचा परिणाम म्हणून विजेची मागणी घटली होती. लॉकडाऊन उठविण्यास सुरुवात झाल्यामुळे आता विजेची मागणी हळूहळू वाढताना दिसून येत आहे. वास्तविक अजून औद्योगिक क्षेत्रातील घडामोडी अजून पूर्णांशाने सुरू झालेल्या नाहीत.
जूनच्या पहिल्या सप्ताहात विजेची मागणी १९.७ टक्क्यांनी घटली होती. त्यानंतर मागणी वाढल्याने घसरण कमी झाल्याचे दिसून येत आहे. तथापि, अजूनही वीज मागणीतील घसरण मे महिन्यातील ८.८ टक्क्यांच्या घसरणीच्या तुलनेत अधिक आहे.
वीज मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, जूनच्या तिसºया सप्ताहात भीषण उकाड्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. १५ जूनपासून देशातील वीज मागणी सुमारे १६२ गिगावॅटच्या आसपास आहे. शुक्रवारी १९ जून रोजी ती १६४.६४ गिगावॅटपर्यंत वाढली होती.
व्यस्त काळात विजेची शीर्ष मागणी ११ जून रोजी १६३.३0 गिगावॅट होती. १२ जून रोजी ती १५८.0२ गिगावॅट, १३ जून रोजी १५७.७९ गिगावॅट आणि १४ जून रोजी १५६.८८ गिगावॅट होती.
या सप्ताहात शीर्ष मागणी १६४.६४ गिगावॅट राहिली. मागील वर्षीच्या जूनमध्ये याच सप्ताहात ती १८२.४५ गिगावॅट होती. याचाच अर्थ यंदा शीर्ष मागणीत ९.७६ टक्के घसरण झाली आहे. मागणी १५ जून रोजी १६२.३५ गिगावॅट असलेली विजेची शीर्ष मागणी १९ जून रोजी १६४.६४ गिगावॅटवर गेली. ४ जूनला ही मागणी १३८.२८ गिगावॅट आणि ६ जूनला १४६.५३ गिगावॅट होती. अशा प्रकारे या काळात विजेची शीर्ष मागणी १४६.५३ गिगावॅट राहिली. मागील वर्षी जूनच्या याच काळात ती १८२.४५ गिगावॅट होती. याचाच अर्थ या काळात विजेची शीर्ष मागणी १९.७ टक्क्यांनी घटली आहे.
या महिन्याच्या दुसºया सप्ताहात व्यस्त काळात विजेची मागणी पहिल्या सप्ताहातील मागणीच्या तुलनेत १८.७ टक्क्यांवरून घटून १0.५ टक्क्यांवर आली. त्याचप्रमाणे जूनच्या तिसºया सप्ताहात ती आणखी थोडी कमी होऊन ९.७६ टक्क्यांवर आली.
>लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून वाढ
एका उद्योग विशेषज्ञाने सांगितले की, व्यावसायिक आणि औद्योगिक घडामोडी जशा वाढतील, तशी विजेची मागणी वाढून सामान्य पातळीच्या दिशेने जात राहील.
कोविड-१९ विषाणूच्या साथीचा मुकाबला करण्यासाठी सरकारने २५ मार्च रोजी देशभरात लॉकडाऊन लागू केले होते. त्यानंतर २0 एप्रिलपासून त्याला शिथिलता आणण्यास सुरुवात केली होती.