उन्हाचा तडाखा ठरतोय जीवघेणा! बिहारमध्ये २०, ओडिशात १० तर...; जाणून घ्या कुठे किती जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 11:28 AM2024-05-31T11:28:11+5:302024-05-31T11:29:33+5:30

गुरुवारी ४७.१ अंश तापमानासह बक्सर हे बिहारमधील सर्वात उष्ण ठिकाण ठरले. तर झारखंडमधील पलामू येथेही ४७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Heatstroke is fatal 20 death in Bihar 10 in Odisha Know where and how many people died in country | उन्हाचा तडाखा ठरतोय जीवघेणा! बिहारमध्ये २०, ओडिशात १० तर...; जाणून घ्या कुठे किती जणांचा मृत्यू

उन्हाचा तडाखा ठरतोय जीवघेणा! बिहारमध्ये २०, ओडिशात १० तर...; जाणून घ्या कुठे किती जणांचा मृत्यू

संपूर्ण देशभरात उन्हाचा कडाका कायम आहे. यामुळे देशातील काही भागांतून मृत्यूच्या घटनाही समोर येत आहेत. बिहार, झारखंड, राजस्थान आणि ओडिशा सारख्या राज्यांत उन्हाच्या तीव्रतेमुळे लोक दगावत आहेत. बिहारमधील औरंगाबादच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उष्णतेच्या लाटेमुळे १२ जणांचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक लोक वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल आहेत. याशिवाय झारखंड, ओडिशा आणि राजस्थानातही मृत्यूच्या घटना घडल्याचे वृत्त आहे.

बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेने २० जणांचा मृत्यू -
बिहारमध्येही उन्हाने कहर केला आहे. येथील वेगवेगळ्या राज्यांतून मृत्यूचे वृत्त आहे. उष्णतेमुळे औरंगाबादमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. तर २० हून अधिक लोक वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल आहेत. बक्सरमध्ये दोन मतदान कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर आरामध्ये आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

ओडिशामध्ये १० जणांचा मृत्यू - 
राउरकेला सरकारी रुग्णालयाचे (आरजीएच) प्रभारी संचालक (डीआयसी) डॉ सुधराणी प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू दुपारी २ वाजल्यापासून सहा तासांच्या आत झाले आहेत. रुग्णालयात पोहचेपर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला होता. तर उरलेल्यांचा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या लोकांच्या शरीराचे तापमान जवळपास 103-104 डिग्री फॅरेनहाइट होते. जे हवामानाचा विचार करता खूप अधिक आहे. आणखीही काही लोकांवर उपचार सुरू आहेत.

झारखंडमध्ये ५ जणांचा मृत्यू - 
गेल्या २४ तासांत येथे पाच लोकांचा मृत्यू झाला. मेदिनीनगर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हमीदगंज येथील रहिवासी विकास कुमारचा (35) मृत्यू झाला. थकबाकीची रक्कम घेण्यासाठी विकास बुधवारी पंकी येथे गेला होता. सायंकाळी परतल्यानंतर तो कचहरी चौकाजवळ अचानक कोसळला. याशिवाय, उत्तर प्रदेशातील कानपूर येथून येणारा एक प्रवासी डालटनगंज रेल्वे स्थानकावर उष्णतेमुळे बेशुद्ध पडला, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनिल कुमार अवस्थी असे या प्रवाशाचे नाव आहे. तसेच, डाल्टनगंज रेल्वे स्थानक परिसरात एका अनोळखी महिलेचा आणि पाटण येथील मुनेश्वर भुईया यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

राजस्थानातही ५ जणांचा मृत्यू -
राजस्थान सरकारने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात उष्णतेच्या लाटेमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. रविप्रकाश माथूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाच्या लाटेतही राज्यातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. आरोग्य विभागाने मार्चपासून आवश्यक तयारी सुरू केली होती. माथूर म्हणाले, राज्यात उष्णतेच्या लाटेमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

काही दिवस कायम राहणार उन्हाची लाट -
येथे काही दिवस बिहारच्या अनेक भागांत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. गुरुवारी ४७.१ अंश तापमानासह बक्सर हे बिहारमधील सर्वात उष्ण ठिकाण ठरले. तर झारखंडमधील पलामू येथेही ४७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याशिवाय, ज्या ठिकाणी ४४ अंश सेल्सिअसपेक्षाही अधिक तापमानाची नोंद झाली, त्यांत औरंगाबाद (४६.१ अंश सेल्सिअस), डेहरी (४६ अंश सेल्सिअस), गया (४५.२ अंश सेल्सिअस), अरवाल (४४.८ अंश सेल्सिअस) आणि भोजपूर (४४.१ अंश सेल्सिअस) तसेच, पाटणा येथे कमाल तापमान ४०.७ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवण्यात आले आहे.

Web Title: Heatstroke is fatal 20 death in Bihar 10 in Odisha Know where and how many people died in country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.