दिल्लीच्या विमानतळावर पावसामुळे भीषण अपघात; टर्मिनलचे छत कोसळले, अनेक गाड्यांचे नुकसान, ३ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 08:05 AM2024-06-28T08:05:33+5:302024-06-28T08:08:39+5:30
दिल्लीत कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडल्याचीही माहिती आहे. याशिवाय दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-१ चे छतही कोसळले.
दिल्लीत कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे उष्णतेपासून दिल्लीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण, मोठं नुकसानही झालं आहे. शुक्रवारी पहाटे सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले. याशिवाय दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-१ चे छतही कोसळले. या घटनेत अनेक वाहनांचे नुकसानही झाले आहे.या कारमध्ये बसलेले तीन जण गंभीर जखमी झाले असून एक जण अडकला आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, मदतकार्य सुरू आहे. दिल्ली अग्निशमन सेवेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "सकाळी ५.३० च्या सुमारास आम्हाला दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल १ वर छत कोसळल्याची माहिती मिळाली. तीन अग्निशमन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत."
भेटीच्या योगायोगाची चर्चा, पण ठरवून झालेल्या भेटीची मात्र नाही, वाचा सविस्तर
या अपघाताचे फोटो, व्हिडीओही समोर आले असून, त्यात टर्मिनलचे अवजड छत वाहनांवर पडले आहे. कारमध्ये बसलेले लोकही यात चिरडले. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शुक्रवारी पहाटे हवामानात अचानक बदल झाला आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. नोएडा, दिल्ली आणि लगतच्या भागात तासाभराहून अधिक काळ जोरदार पाऊस झाला. या पावसाने उन्हापासून दिलासा मिळाला असतानाच अनेक ठिकाणी रस्तेही जलमय झाले आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडल्याचीही माहिती आहे.
नोएडामध्ये अनेक ठिकाणी रस्ते पाण्याने भरले
नोएडामध्ये अनेक ठिकाणी रस्ते पाण्याने भरले होते. त्यामुळे वाहनचालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सेक्टर-९५ मध्ये रस्त्यावर पाणी साचले, त्यामुळे वाहनांचा वेगही कमी झाला. सकाळी साडेसहाच्या सुमारास पाण्यामुळे अनेक वाहनांच्या काचाही फुटल्या.
हवामान खात्याने २९ आणि ३० जून रोजी दिल्लीत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय, २८ जून रोजी आयएमडीने दिल्ली आणि आसपासच्या भागात ३० ते ४० किमी प्रति तास वेगाने वारे आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला होता. आयएमडीनुसार, या संपूर्ण आठवड्यात दिल्लीचे कमाल तापमान ३४ ते ३७ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
#WATCH | 4 people were injured after a roof collapsed at the Terminal-1 of Delhi airport. Rescue operation underway pic.twitter.com/A0KHLFFTH6
— ANI (@ANI) June 28, 2024