ओडिशाला चक्रीवादळाचा जोरदार तडाखा, प्रचंड नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 03:57 AM2019-05-04T03:57:58+5:302019-05-04T03:58:52+5:30
‘फनी’चा कहर : पश्चिम बंगाल व बांगलादेशकडे सरकले वादळ
भुवनेश्वर : मुसळधार पाऊस आणि ताशी १७५ किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह फोनी चक्रीवादळ शुक्रवारी सकाळी ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले. या भयावह चक्रीवादळाच्या तडाख्याने अनेक झाडे उन्मळून पडली आणि घरे, रस्त्यावरील वाहने व झोपड्या उद्ध्वस्त झाल्या. अनेक रस्त्यांना मोठ्या भेगा पडल्या. पुरी शहरातील बराच भाग पाण्याखाली आहे. या वादळाने आठ जणांचे बळी घेतले.
पुढे वादळाचा वेग कमी झाला व ते पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनाऱ्याच्या दिशेला सरकले. त्यामुळे तिथेही जोरदार पाऊस सुरू झाला. मात्र, मनुष्यहानीचे वृत्त नाही. बांगलादेशातील पाच लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. या वादळामुळे नेपाळमधील तापमानात बदल झाले असून, तिथेही जोरदार पावसाची शक्यता आहे.
ओडिशाचे विशेष आयुक्त बी. पी. सेठी म्हणाले की, चक्रीवादळामुळे गंजम, पुरी, खोरधा आणि गजपती या जिल्ह्यांतील १० हजार गावे आणि ५२ शहरी भागांतील १२ लाख लोकांना ४,००० शिबिरांत हलविण्यात आले. यात ८८० तटरक्षक दलांच्या केंद्रांचा समावेश आहे. एक लाख भोजनाची पाकिटे वाटली असून, लोक शिबिरांत असेपर्यंत त्यांची खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात येईल. प्रसंगी दोन हेलिकॉप्टरचा उपयोग करण्यात येईल.
चक्रीवादळाचा फटका बसलेल्या राज्यांच्या संपर्कात केंद्र सरकार असून, या राज्यांना गरजेनुसार १००० कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. चक्रीवादळामुळे कोलकाता विमानतळावरून शुक्रवारी दुपारी ३ ते शनिवारी सकाळी ८ पर्यंत विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. याशिवाय सुमारे ३00 हून अधिक रेल्वेगाड्या आज रद्द करण्यात आल्या आणि काहींचे मार्ग बदलण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले.
१२ लाख लोक सुरक्षित ठिकाणी
प्रचंड वेगाने आलेले चक्रीवादळ सकाळी ८ वाजता पुरीच्या समुद्र किनाºयावर धडकले. या वादळाआधीच राज्य सरकारने १२ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले होते. पुरी व आसपासच्या परिसरात ताशी १७५ किमी वेगाने वारे वाहत होते. त्यांचा वेग पुढे २०० किमी झाला. त्यामुळे रस्ते, घरे, झोपड्या व वृक्ष यांचे मोठे नुकसान झाले. वादळासोबतच्या मुसळधार पावसाने अनेक गावे, छोटी शहरे पूर्ण पाण्याखाली गेली आहेत.
तटरक्षक, नौदल सज्ज
भारतीय तटरक्षक दलाने विशाखापट्टणम, चेन्नई, गोपालपूर, हल्दिया व कोलकातामध्ये ३४ आपत्कालीन केंद्रे सुरू केली आहेत. चार जहाजेही सज्ज आहेत. नौदलाने मदत साहित्य आणि मेडिकल टीमसह तीन जहाजेही तैनात केली आहेत. नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, हवाई सर्वेक्षणासाठी आमची विमाने तयार आहेत. फोनी हे सर्वात धोकादायक चक्रीवादळ समजले जाते. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी जनतेला घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील या ११ जिल्ह्यांत सर्व दुकाने, व्यवसायिक प्रतिष्ठाने, सरकारी आणि खासगी कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. शनिवारीही ती बंद राहतील.