उत्तराखंडच्या चार जिल्ह्यात ढगफुटी, पुढील 24 तास सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2018 08:23 AM2018-06-02T08:23:13+5:302018-06-02T08:23:13+5:30
ढगफुटीमुळे तेथे मोठं नुकसान झालं आहे.
देहरादून- उत्तराखंडमध्ये मान्सून पोहचायला अजून वेळ असला तरी तेथे वातावरण अतिशय खराब झालं आहे. शुक्रवारी दुपारनंतर उत्तराखंडमधील चार जिल्ह्यांमध्ये ढगफुटी झाली. ढगफुटीमुळे तेथे मोठं नुकसान झालं आहे. टिहरी, उत्तरकाशी, पौडी आणि नैनीताल जिल्ह्यांमध्ये ढगफुटी झाली. ढगफुटीनंतर उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये मुसळधार पाऊस झाला. ढगफुटीमुळे तेथिल स्थानिक नद्या व नाले दुधडी भरून वाहू लागले तसंच तेथिल घरांमध्येही पाणी शिरलं आहे. पादचारी मार्ग वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ढगफुटीमुळे बद्रीनाथ हायवेही आठ तास बंद ठेवण्यात आला. वातावरणाती बिघाड लक्षात घेता सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून एसडीआरएफ आणि एनडीआरएफसह पोलिसांनाही हायअलर्ट देण्यात आला आहे.
रम्यान, उत्तराखंडमधील बिघडलेलं वातावरण लक्षात घेता हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्य हवामान केंद्राचे निर्देशक विक्रम सिंह यांच्या माहितीनुसार, देहरादून, उधमसिंहनगर, हरिद्वार आणि पौडी गढवालमध्ये 70 ते 80 किलोमीटर प्रतीतास या वेगाने वारे वाहतील. उत्तराखंडाच्या डोंगराळ भागात तुफान पाऊस होण्याचा अंदाज त्यांनी वर्तविली आहे.
उत्तराखंडमध्ये वातावरण खराब झाल्यानंतर दिल्लीमध्येही वेगाने वारे वाहिले. राजधानी दिल्लीतील अनेक भागात धुळीचं वादळ आल्याने झाडांची मोठी हानी झाली. अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. अलीपूरमध्ये विजेचा खांब एक दूचाकीवर पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला.