VIDEO: कर्नाटकमध्ये आगमनाच्या दिवशीच मान्सूनचा कहर; वाहतूक ठप्प; शाळांना उद्या सुट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 09:59 PM2018-05-29T21:59:17+5:302018-05-29T21:59:17+5:30
सकाळी 9.30 वाजल्यापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.
बंगळुरू: गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण देशाला प्रतिक्षा लागून राहिलेल्या मान्सूनच्या नुसत्या आगमनामुळेच कर्नाटकला मोठा तडाखा बसला आहे. कर्नाटकमध्ये यंदा मान्सूनचे वेळेपेक्षा लवकर आगमन झाले. सोमवारी रात्रीपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. आज सकाळी पावसाने काही वेळासाठी उसंतही घेतली होती. मात्र, 9.30 वाजल्यापासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळायला सुरूवात झाली. याचा सर्वाधिक फटका मंगळुरू शहराला बसला आहे. पहिल्याच पावसात येथील जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी मदत यंत्रणांना पाचारण करण्याची वेळ ओढावली आहे.
शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साठले आहे. तर मुसळधार पावसामुळे मंगळुरू विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता उद्या शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
#WATCH Rescue operations underway in Mangalore's Panambur as streets are water-logged following pre-monsoon rains pic.twitter.com/7zNI4v0RNT
— ANI (@ANI) May 29, 2018
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून चिंता व्यक्त केली आहे. कर्नाटकमध्ये मुसळधार पावसामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मी प्रार्थना करतो. मी स्थानिक अधिकाऱ्यांना नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिल्याचे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
भारतीय हवामान विभागाने २९ मे रोजी मान्सूनचे केरळला आगमन होणार असल्याचा अंदाज जाहीर केला होता़. हा अंदाज यंदा बरोबर ठरला. मान्सून वेळेआधी केरळात दाखल झाल्याने सध्या बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रातही मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
I pray for the safety and wellbeing of all those affected by heavy rains in various parts of Karnataka. Have spoken to officials and asked them to ensure all possible assistance in the affected areas.
— Narendra Modi (@narendramodi) May 29, 2018