देशभरात २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा; बिहारमध्ये गेल्या २४ तासांत वीज पडून १५ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 06:38 AM2023-07-07T06:38:58+5:302023-07-07T06:39:10+5:30
गेल्या आठवड्यात गुजरात, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सर्वाधिक पाऊस झाला.
नवी दिल्ली : येत्या २४ तासांत झारखंड वगळता देशातील सर्व राज्यांमध्ये हवामान विभागाने (आयएमडी) अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. गुरुवारी सकाळपासून दिल्ली-एनसीआर आणि दक्षिणेकडील केरळ राज्यातील ६ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. बिहारमध्ये गेल्या २४ तासांत विविध ठिकाणी वीज पडून १५ जणांचा मृत्यू झाला.
गेल्या आठवड्यात गुजरात, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सर्वाधिक पाऊस झाला. २९ जून ते ५ जुलैदरम्यान बिहारमध्ये १३४ मिमी, गुजरातमध्ये १३३ मिमी आणि उत्तर प्रदेशमध्ये ७८ मिमी पाऊस झाला. छत्तीसगडमध्ये या काळात केवळ ३६ मिमी पाऊस झाला.
राजस्थानात १४२% जास्त पाऊस
राजस्थानमध्ये जून महिन्यात सरासरीपेक्षा १४२ टक्के जास्त पाऊस झाला. बिपोरजॉयमुळे राजस्थानमध्ये जून महिन्यात १५६ मिमी पाऊस झाला. कानपूरमध्ये गंगेच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे ३५ मदत केंद्रांसह ४८ पाणबुडे तैनात करण्यात आले आहेत.