तामिळनाडु, पाँडेचरी व दक्षिणेत १ ते ३ डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता; राज्यात ढगाळ वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 09:42 PM2020-11-28T21:42:18+5:302020-11-28T21:50:32+5:30
बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र; राज्यात ढगाळ वातावरण, तापमानात वाढ
पुणे : निवार चक्रीवादळ निवळल्यानंतर बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे तामिळनाडु, पाँडेचरी व दक्षिणेत १ ते ३ डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात शनिवारी सर्वत्र ढगाळ वातावरण असून तापमानात वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान वाशिम येथे १४.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
निवार चक्रीवादळाने तामिळनाडु, पाँडेचरी परिसरात मोठे नुकसान घडवून आणले होते. त्यानंतर आता पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. सध्या ते दक्षिण अंदमान समुद्राजवळ आहे. पुढील ४८ तासात त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. ते २ डिसेंबर रोजी दक्षिण तामिळनाडु किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे तामिळनाडु, पाँडेचरी परिसरात १ ते ३ डिसेंबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या २४ तासात विदर्भातील देऊळगाव राजा, रामटेक, दारव्हा, पौनी, पेंद्रा तसेच मध्य महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर परिसरात हलका पाऊस झाला.
मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात लक्षणीय वाढ झाली आहे. २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
कमाल तापमानात घट तर, किमान तापमानात वाढ; पुणेकरांनी घेतला विचित्र हवामानाचा अनुभव
दाट धुके, बोजरी हवा असतानाच ढगाळ वातावरणामुळे पुणे शहरातील किमान तापमानात शनिवारी राज्यात सर्वाधिक वाढ दिसून आली. पुणे शहरात शनिवारी सकाळी १९.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. ही सरासरीच्या तुलनेत ६.६ अंश सेल्सिअसने अधिक आहे. शुक्रवारी सकाळी शहरात १४.१ अंश सेल्सिअस तर, गुरुवारी १३.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती.
शुक्रवारी रात्री शहरात अनेक ठिकाणी धुके पडले होते. त्यात ढगाळ हवामान होते. त्यात थंड वारे वाहत असल्याने एकाचवेळी थंडी जाणवत होती. तर ढगाळ आकाशामुळे आर्द्रता वाढल्याने उकाडा जाणवत होता. कधीही पाऊस पडले, असे जाणवत होते. त्यामुळे दिवसाचे कमाल तापमान आज अचानक घसरले. सायंकाळी शहरात कमाल तापमान २५.३ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. ते सरासरीपेक्षा ४ अंश सेल्सिअसने कमी आहे. किमान तापमानात वाढ तर कमाल तापमानात घट असा विचित्र अनुभव पुणेकरांना आज आला.