दिल्ली-उत्तर प्रदेशसह २१ राज्यात मुसळधार पाऊस; रेल्वे रुळ खचला, बद्रीनाथ महामार्ग बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 08:10 AM2023-09-11T08:10:44+5:302023-09-11T08:11:00+5:30
पावसामुळे दिल्लीतील तापमानाचा पारा सामान्यपेक्षा पाच अंश सेल्सिअसने घसरला.
नवी दिल्ली: दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह पश्चिमेकडून पूर्व आणि उत्तर ते दक्षिण भारतात पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे उत्तर प्रदेशात रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. तसेच उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याने बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे.
पावसामुळे दिल्लीतील तापमानाचा पारा सामान्यपेक्षा पाच अंश सेल्सिअसने घसरला. कमाल तापमान २८.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गेल्या २४ तासांत ३८.६ मिमी पावसाची नोंद झाली. तीन दिवसांच्या पावसासोबतच चमोलीत हंगामातील पहिला हिमवृष्टीही झाली. पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे बद्रीनाथ धाम, हेमकुंड साहिब आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये थंडी सुरू झाली. केदारनाथच्या डोंगरांव्यतिरिक्त नीलकंठ, बद्रीनाथ धामच्या नर नारायण पर्वतासह इतर शिखरांवर बर्फवृष्टी झाली आहे.
राजस्थानमधील मुसळधार पावसामुळे झाशी विभागातील हेतमपूर-धोलपूर दरम्यान रविवारी सकाळी झाशी-दिल्ली ट्रॅक खचला. ट्रॅकखाली माती घुसल्याने गाड्या तात्काळ ठिकठिकाणी थांबवण्यात आल्या. त्यामुळे सुमारे साडेचार तास रेल्वे वाहतूक प्रभावित झाली. त्याचवेळी वंदे भारत, शताब्दी, गतिमान आणि राजधानीसह २० गाड्या उशिराने धावल्या. गाझियाबादमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले आहे. लोक त्यांच्या घरात अडकल्याचे पाहायला मिळाले. वाहने पाण्यात बुडाली होती. लालकुआन येथे एका कारचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या खड्ड्यात पलटी झाली.