दिल्लीत मुसळधार पाऊस, नोएडातील सर्व शाळा बंद; दिल्ली-मेरठ मार्गावर साचले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 12:19 PM2023-07-26T12:19:51+5:302023-07-26T12:35:14+5:30
मुसळधार पावसामुळे यमुनापारमधील अनेक वसाहतींमध्ये पाणी साचले होते.
नवी दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक ठिकाणी वाहतुक कोंडी झाली आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिल्लीतील अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर दिल्ली-मेरठ एक्सप्रेस वेवरदेखील पाणी साचले आहे. नोएडामध्येही मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे सेक्टर आणि गावातील रस्त्यांवर पाणी साचले आहे.
मुसळधार पावसामुळे यमुनापारमधील अनेक वसाहतींमध्ये पाणी साचले होते. खजुरी खास, करवल नगर, साबोली, मंडोली, एनएच-९ जवळील आयपी एक्स्टेंशन, राजगड एक्स्टेंशन, कृष्णा नगर यासह अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना त्रास झाला. दुसरीकडे मयूर विहार, लोहा पुल आणि खजुरी पुष्टा येथील मदत छावण्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हवामान विभागाने पुढील तीन दिवस २२हून अधिक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसह संपूर्ण उत्तर पश्चिम भारत ते ईशान्य आणि दक्षिण भारत राज्यांचा समावेश आहे. आज मध्य महाराष्ट्र, पूर्व गुजरात, कोकण, गोवा, तेलंगणा, रॉयल सीमा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे.
#WATCH | Delhi: Waterlogging situation on ITO road after rain lashes parts of national capital. pic.twitter.com/aGn8XecqQD
— ANI (@ANI) July 26, 2023
उत्तराखंडमध्ये हवामान जवळजवळ स्वच्छ होते, परंतु नंदप्रयागमध्ये ढिगारा पडल्याने बद्रीनाथ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मंगळवारीही भूस्खलनामुळे यमुनोत्री रस्ता बंद होता. मात्र, केदारनाथ यात्रा सुरूच आहे. राज्यात सध्या ५० रस्ते बंद असून सुमारे ४० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. ४०० छोटे-मोठे कालवे वाहून गेले आहेत. हरिद्वारमध्ये, गंगा अजूनही २९३.४५ मीटरवर, धोक्याच्या चिन्हाच्या (२९३ मीटर) वरती वाहत आहे.
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे पाच घरे उद्ध्वस्त
हिमाचलच्या कुल्लूच्या गडसा खोऱ्यात मंगळवारी पहाटे ४ वाजता ढगफुटीमुळे पंचनाला आणि हुर्ला नाल्यांना मोठा पूर आला. पाच घरे वाहून गेली असून १५ घरांचे नुकसान झाले आहे. चार छोटे-मोठे पूलही वाहून गेले असून काही गुरे बेपत्ता आहेत. भुंतर-गडसा मणियार रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पार्वती खोऱ्यातील मणिकर्ण येथे ब्रह्मगंगा नाल्याला आलेल्या पुरात एका कॅम्पिंग साईटचे नुकसान झाले आहे. माळणा प्रकल्पाच्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पांडोह धरणातून पाणी सोडल्याने बियासच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. ५००हून अधिक रस्ते बंद आहेत.