देशातील अनेक भागांत धो-धो पाऊस, बिहारमध्ये ८० लाख लोकांंना पुराचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 02:46 AM2020-08-19T02:46:28+5:302020-08-19T06:52:14+5:30
महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यात काही भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली : देशात अनेक भागांत झालेल्या जोरदार पावसानंतर अनेक नद्यांना पूर आलेला आहे. पूर्वाेत्तर भारताचा काही भाग एक महिन्यापासून पुराचा सामना करीत आहे. राजस्थानात पाऊस आणि पुराने सात जणांचा बळी घेतला आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यात काही भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
बिहारमध्ये पुराचा ८० लाख लोकांना फटका बसला आहे, तर आतापर्यंत २५ जणांचा पावसाशी संबंधित दुर्घटनांत मृत्यू झाला आहे. पूर्वाेत्तरमध्ये आसामच्या धेमाजी, लखीमपूर आणि बक्सामध्ये जवळपास १२ हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे. हवामान विभागाने सांगितले की, उत्तर पश्चिम आणि पश्चिमोत्तर भागात येत्या दोन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अधिकाऱ्यांना उपाययोजनांबाबत सूचना केल्या आहेत. एनडीआरएफच्या टीम तीन जिल्ह्यांसाठी व एसडीआरएफच्या टीम २० जिल्ह्यांसाठी तैनात केल्या आहेत.
चुरू आणि नागौरमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ओडिशाच्या काही भागांत १३ आॅगस्टपासून पूरस्थिती आहे. महाराष्ट्रात कृष्णा, वारणा आणि कोयनाची पाणीपातळी वाढली आहे.
>आंध्रात अनेक गावे जलमय
आंध्र प्रदेशात अनेक गावे अद्यापही जलमय आहेत. मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी परिस्थितीची माहिती घेतली आणि जिल्हाधिकाºयांना निर्देश दिले की, पूरग्रस्त भागातील लोकांना तात्काळ प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत केली जावी.
>उत्तर प्रदेशात १५ जिल्ह्यांत पूर
उत्तर प्रदेशात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. पूरग्रस्त भागात लोकांच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या १५ आणि एसडीआरएफ व अन्य अशा एकूण २२ टीम काम करीत आहेत. पूरग्रस्त भागात धान्याचे कीट पुरविण्यात येत आहेत. उत्तर प्रदेशातील १५ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. पश्चिम मध्यप्रदेशात आगामी तीन ते चार दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे.