काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडात प्रचंड हिमवृष्टी सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 04:38 AM2020-01-23T04:38:40+5:302020-01-23T04:40:04+5:30
काही ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे जम्मू- काश्मीर महामार्गावरील वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी बुधवारीही ठप्प होती.
जम्मू : काही ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे जम्मू- काश्मीर महामार्गावरील वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी बुधवारीही ठप्प होती. साºया देशाला जम्मू- काश्मीरशी जोडणाºया महामार्गावरील वाहतूक हिमवृष्टी, तसेच जोरदार पावसामुळे बंद ठेवण्यात आली आहे. वाहनावर दरड कोसळून एकाचा मृत्यूही झाला. उत्तराखंड व हिमाचल प्रदेशातही हिमवृष्टी सुरू असून, तेथील ५00 हून अधिक रस्ते बंद आहेत. दिल्लीत प्रचंड धुके आहे.
पंथियाल, मौम्पासी, दिगडोले येथे दरडी कोसळल्याने रस्ता निसरडा झाला आहे. त्यामुळे रस्त्यावर साचलेली माती व दगडांचा ढिगारा हलवून वाहतूक पूर्ववत करण्यात अनेक अडचणी येत आहेत. जवाहर बोगद्याच्या परिसरात नुकतीच साधारण एक फूट हिमवृष्टी झाली. त्या भागात रस्त्यावर साचलेले बर्फ हटवून तेथून एकेरी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. हिमवृष्टीमुळे विविध ठिकाणी अडकून पडलेल्या सुमारे दीड हजार वाहनांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली. रामबनमध्ये जोरदार पावसामुळेही दरडी कोसळल्या होत्या.
काश्मीरमधील गुलमर्ग, पहलगाम यासह अधिक उंचीवर असलेल्या काही ठिकाणी बुधवारी हिमवृष्टी झाली. श्रीनगरमध्ये उणे ०.४ अंश, तर काझीगुंडमध्ये उणे २.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पहलगाममध्ये उणे ५.२, गुलमर्गमध्ये उणे ८ अंश सेल्सिअस तापमान होते. सर्वात थंड ठिकाण म्हणून गुलमर्गची नोंद झाली.
दिल्लीत विमान, रेल्वेसेवा विस्कळीत
दिल्लीमध्ये बुधवारी सकाळी दाट धुक्यामुळे वातावरण धूसर झाल्याने विमान व रेल्वेसेवेवर परिणाम झाला. दिल्लीला येणारी पाच विमाने दुसरीकडे वळविण्यात आली, तर २२ रेल्वे सुमारे आठ तासांपर्यंत उशिरा धावल्या. दिल्लीमध्ये ७ अंश सेल्सिअस तापमान होते. दिल्लीत धुक्यामुळे रेल्वे रुळांवर २५ ते ५० मीटरच्या पलीकडचे सारे धूसर दिसत होते.