देशातील 6 राज्यात भीषण पाणीसंकट; केंद्र सरकारने दिल्या खबरदारीच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 02:53 PM2019-05-22T14:53:02+5:302019-05-22T14:53:31+5:30
येणाऱ्या काळात ही पाणीसंकट भीषण होणार आहे. मागील दहा वर्षात पहिल्यांदा पाणीसाठ्याची सरासरी 20 टक्क्यांहून कमी झाली आहे.
नवी दिल्ली - देशात वाढत्या तापमानासोबत भीषण पाणीटंचाईचं संकट उभं राहिले आहे. देशातील 6 राज्यांमध्ये पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या राज्यातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. पाणी संकटपाहता केंद्र सरकारने या सहा राज्यांसाठी खबरदारी सूचना जारी केली आहे. मान्सून येईपर्यंत या राज्यात पाण्याचा वापर करताना काळजी बाळगा, मान्सून येत नाही तोवर या राज्यांना पाणीटंचाईला सामोरे जावं लागणार आहे.
या सहा राज्यात पाणीसंकट
केंद्र सरकारने खबरदारी सूचना जारी केली आहे याराज्यांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. या राज्यातील धरणांतील पाणीसाठा खालच्या स्तरावर पोहचल्याने पाणी टंचाई जाणवू शकते. येणाऱ्या काळात ही पाणीसंकट भीषण होणार आहे. मागील दहा वर्षात पहिल्यांदा पाणीसाठ्याची सरासरी 20 टक्क्यांहून कमी झाली आहे.
गुजरात, महाराष्ट्रात ४.१० अब्ज घनमीटर जिवंत पाणीसाठा
पश्चिम विभागातील गुजरातेत १० आणि महाराष्ट्रात १७ जलाशय आहेत. या जलशयांची जिवंत पाणीसाठ्याची एकूण क्षमता ३१.२६ अब्ज घनमीटर आहे. तथापि, १६ मेपर्यंत या जलाशयांतील जिवंत साठा ४.१० अब्ज घनमीटर होता. एकूण जिवंतसाठ्यापेक्षा हे प्रमाण १३ टक्के आहे. मागच्या वर्षात या २७ जलाशयांतील पाणीसाठ्याचे प्रमाण १८ टक्के, तर मागील दहा वर्षांत २२ टक्के होते.
दक्षिण भागात आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूचा समावेश आहे. या राज्यांतील ३१ जलाशयांतील जिवंत साठ्याची एकूण क्षमता ५१.५९ अब्ज घनमीटर आहे. केंद्रीय जल आयोगाच्या पाहणीनुसार फक्त ६.८६ अब्ज घनमीटर जिवंत साठा आहे. हे प्रमाण एकूण जिवंत साठ्याच्या १३ टक्के आहे.
देशभरातील मोठ्या ९१ जलशयांतील उपलब्ध पाणीसाठ्याचे केंद्रीय जल आयोगाकडून आकलन केले जाते. केंद्रीय आयोगाने गुरुवारी जारी केलेल्या पाणीसाठा आकडेवारीनुसार आजघडीला ३५.९९ अब्ज घन मीटर पाणीसाठा आहे. या जलशयांच्या एकूण पाणी साठवण क्षमतेपेक्षा हे प्रमाण २२ टक्के आहे. या ९१ जलाशयांची पाणीसाठवण क्षमता एकूण १६१.९९३ अब्ज घनमीटर आहे. ९ मे रोजी संपलेल्या आठवड्यातील उपलब्ध पाणीसाठा २४ टक्के होता. त्यामुळे पश्चिम आणि दक्षिणेकडील राज्यांतील पाणीटंचाईची स्थिती गंभीर दिसते.