नर्मदा धरणाची उंची १७ मीटरने वाढणार
By Admin | Published: June 13, 2014 02:39 AM2014-06-13T02:39:52+5:302014-06-13T02:39:52+5:30
निसर्गाच्या अवकृपेमुळे कायम पाणीटंचाईचा सामना कराव्या लागणाऱ्या गुजरातवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कृपा झाली आहे़
अहमदाबाद/नवी दिल्ली : निसर्गाच्या अवकृपेमुळे कायम पाणीटंचाईचा सामना कराव्या लागणाऱ्या गुजरातवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कृपा झाली आहे़ आठ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर गुजरात सरकारला नर्मदा धरण अर्थात सरदार सरोवर या देशातील सर्वाधिक वादग्रस्त ठरलेल्या प्रकल्पाची उंची वाढवून १३८़७२ मीटर (४५५ फूट) करण्यास आणि त्यास दरवाजे लावण्यास मंजुरी मिळाली आहे़
गुजरातचे माजी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर उण्यापुऱ्या १५ दिवसांतच हा निर्णय घेण्यात आला़ नर्मदा नियंत्रण प्राधिकरणा(एनसीए)च्या अंतिम परवानगीनंतर आज गुरुवारी या निर्णयाची घोषणा करण्यात आली़ गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी हा निर्णय जाहीर केला़ नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाने (एनसीए) नर्मदा धरणाची उंची वाढवून १३८़७२ मीटर (४५५ फूट) करण्यास परवानगी दिली आहे, असे त्यांनी सांगितले़ गुजरातसाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे त्या म्हणाल्या़ या निर्णयासाठी आनंदीबेन यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातच्या जनतेकडून धन्यवाद़ अनेक वर्षे रखडलेला एक निर्णय मार्गी लागला़ चांगले दिवस आले आहेत, अशी भावना त्यांनी टिष्ट्वटरवरून व्यक्त केली़ यापश्चात केंद्रीय जलस्रोतमंत्री उमा भारती यांनी एका पत्रपरिषदेत नर्मदा धरणाची उंची वाढविण्यास परवानगी देण्यात आल्याचा वृत्ताला दुजोरा दिला़ उंची वाढविण्याच्या निर्णयानंतर गुजरातच्या केवडियास्थित नर्मदा धरणाची उंची १२१़९२ मीटरवरून वाढून १३८़७२ मीटर होईल़ नर्मदा बचाओ आंदोलनासह अनेक स्वयंसेवी संघटना आणि पर्यावरणप्रेमींचा सरदार सरोवर प्रकल्पाची उंची वाढविण्यास विरोध होता़ प्रकल्पाची उंची वाढविल्याने सुमारे अडीच लाख लोक विस्थापित होतील, असे त्यांचे म्हणणे होते़ गुजरात सरकारने मात्र हा विरोध डावलून प्रकल्पाची उंची वाढविण्याची मागणी लावून धरली होती़ प्रकल्पाची उंची न वाढविल्यामुळे आणि त्यावर दरवाजे नसल्याने वार्षिक ३७८८ कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचा गुजरात सरकारचा दावा होता़ राज्य सरकारच्या मते, उंची वाढविल्यामुळे ६़८ लाख हेक्टर जमीन अतिरिक्त सिंचनाखाली जाईल़ ४० टक्के वीज उत्पादन वाढेल. यापूर्वी २००६मध्ये नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाने प्रकल्पाची उंची ११०़६४ मीटरवरून वाढवून १२१़९२ करण्यास परवानगी दिली होती़ भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ५ एप्रिल १९६१ रोजी नर्मदा धरणाची कोनशिला ठेवली होती़ या धरणामुळे प्रभावित लोकांच्या विस्थापनावरून हा प्रकल्प वादग्रस्त ठरला होता़ (लोकमत न्युज नेटवर्क)