माजी वायुदल प्रमुखाच्या कुटुंबियांच्या संपत्तीवर टाच

By admin | Published: October 2, 2015 03:39 AM2015-10-02T03:39:02+5:302015-10-02T03:39:02+5:30

३६०० कोटी रुपयांच्या व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर्स सौद्यातील मनी लाँड्रिंग तपासाच्या संदर्भात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी माजी भारतीय वायुदल प्रमुख एस. पी. त्यागी

The heir to the wealth of the former Air Chief's family | माजी वायुदल प्रमुखाच्या कुटुंबियांच्या संपत्तीवर टाच

माजी वायुदल प्रमुखाच्या कुटुंबियांच्या संपत्तीवर टाच

Next

नवी दिल्ली : ३६०० कोटी रुपयांच्या व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर्स सौद्यातील मनी लाँड्रिंग तपासाच्या संदर्भात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी माजी भारतीय वायुदल प्रमुख एस. पी. त्यागी यांच्या चुलत भावांच्या नावावर असलेले राजधानी दिल्ली आणि सभोवतालच्या भागांतील पाच आलिशान फ्लॅट जप्त केले.
त्याआधी ईडीने त्यागी यांचे चुलत भाऊ संजीव, संदीप आणि राजीव यांच्या विरुद्ध जप्ती आदेश जारी केला होता. या हेलिकॉप्टर्स सौद्यातील ‘गुन्ह्याच्या कमाई’चा या तिघांनी या पाच संपत्ती खरेदी करण्यास उपयोग केला, ज्या आता जप्त करण्यात आलेल्या आहेत, असे या आदेशात म्हटले आहे. ‘सखोल चौकशीनंतर त्यागी बंधूंच्या या ६.२० कोटी रुपये किमतीच्या पाच स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्त करण्यात आल्या आहेत,’ असे ईडीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीत गुडगाव येथील फेज-५ मधील एक फ्लॅट, नोएडाच्या सेक्टर-५० मधील दोन फ्लॅट, दिल्लीच्या केजी मार्ग येथील एक फ्लॅट आणि गाझियाबादच्या कोशांबी येथील बिझनेस सेंटरमध्ये पाचव्या माळ्यावर असलेल्या फ्लॅटचा समावेश आहे.
या पाचही फ्लॅटची किंमत ईडीच्या अंदाजापेक्षा कितीतरी पट अधिक आहे, असे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी ईडीने गेल्या वर्षी मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल केला होता. इटलीतील मेसर्स फिनमेक्कानिका कंपनीची उपकंपनी असलेल्या ब्रिटनमधील अगुस्ता वेस्टलँडला हे हेलिकॉप्टर्स खरेदीचे कंत्राट मिळावे यासाठी ख्रिश्चन मिशेल, कार्लो गरोसा व गुईडोहॅश्चके या युरोपियन व्यापाऱ्यांनी सुमारे ४२३ कोटी रुपयांची (५८ दशलक्ष युरो) लाच दिल्याचा आरोप आहे. या सौद्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप लावण्यात आल्यानंतर सरकारने हा सौदा रद्द केला होता. या सौद्यांतर्गत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ३६०० कोटी रुपयांचे १२ प्रगत हेलिकॉप्टर्स खरेदी केले जाणार होते. त्यासाठी मध्यस्थाने त्यागी बंधूंना ७.६८ कोटी रुपये लाच दिली. ही लाच त्यांना बँकेद्वारे आणि रोख स्वरूपात मिळाली, असा ईडीचा आरोप आहे.

Web Title: The heir to the wealth of the former Air Chief's family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.