Helicopter crash : ब्रिगेडियर लिड्डर यांच्या निधनानंतर मुलीच्या पुस्तकाला मोठी मागणी, 4 दिवसांत SOLD OUT
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 05:27 PM2021-12-11T17:27:21+5:302021-12-11T17:28:11+5:30
Aashna Lidder book : गेल्या काही दिवसांपासून तिच्या 'इन सर्च ऑफ ए टायटल' (In Search of a Title: Musings Of A Teenager) या पुस्तकाची मागणी प्रचंड वाढली आहे.
'SOLD OUT'...हा फलक त्या दुकानात लावण्यात आला आहे, जिथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत (Helicopter crash) मृत्यू झालेल्या ब्रिगेडियर एल एस लिड्डर यांची मुलगी आशना लिडर हिने लिहिलेले पुस्तक विकले जात होते. 8 डिसेंबर रोजी तामिळनाडूतील कुन्नूर येथे झालेल्या अपघातात ब्रिगेडियर एलएस लिड्डर यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या 17 वर्षांच्या मुलीने लिहिलेले पुस्तक मोठ्या प्रमाणात विकले जात आहे. गेल्या 4 दिवसांत हे पुस्तक एवढं विकलं की त्याचा स्टॉक संपला आहे.
या दुःखाच्या वेळी ब्रिगेडियर एल एस लिड्डर यांची 17 वर्षीय मुलगी आशना लिड्डर हिने दाखवलेले धैर्य आणि दृढ निश्चयाने अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. योगायोगाने, गेल्या काही दिवसांपासून तिच्या 'इन सर्च ऑफ ए टायटल' (In Search of a Title: Musings Of A Teenager) या पुस्तकाची मागणी प्रचंड वाढली आहे. या पुस्तकात किशोरवयीन मुलाचे अनुभव, चिंतन आणि शिकण्याच्या प्रवासाचे वर्णन केले आहे. हे पुस्तक आता दुकानांमध्ये उपलब्ध नाही.
आशनाचे प्रकाशक क्रिएटिव्ह क्रोजद्वारे (Creative Crows) सांगण्यात आले आहे की, अचानक त्यांच्या पुस्तकांची मागणी प्रचंड वाढली आहे. आता आम्ही त्याच्या आणखी प्रती प्रकाशित करत आहोत. 250 प्रती आधीच विकल्या गेल्या आहेत. या पुस्तकासाठी अनेक लोक येत असून आम्ही प्रकाशनाचे काम सुरू केले आहे.
याचबरोबर, प्रकाशक गणिव चढ्ढा म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच ब्रिगेडियर एल एस लिड्डर यांनी त्यांच्या आयुष्यातील दोन टप्पे गाठले. एल एस लिड्डर यांना आपल्या मुलीचे पुस्तक लवकरात लवकर प्रकाशित करायचे होते. दिवाळीची तारीख ठरली. मात्र, आशना आणि तिच्या आईने थँक्सगिव्हिंग डे ची तारीख निश्चित केली. अलीकडेच एल एस लिड्डर आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्या लग्नाचा रौप्यमहोत्सवी सोहळा साजरा केला. या कार्यक्रमात त्यांनी म्हटले होते की, "मी गीतिकाचे 25 वर्षे नेतृत्व केले आहे, परंतु पुढील 25 वर्षे मी तिच्या पावलावर पाऊल टाकेन."
एल एस लिड्डर यांचे कुटुंब सध्या कॅमेरापासून दूर एकांतात शोक व्यक्त करत आहे. आशना लिड्डर सध्या बारावीत शिकत असून बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत आहे. त्यांच्या घरी उपस्थित असलेल्या एका मैत्रिणीने सांगितले की, घरात दुःखाचे आणि तणावाचे वातावरण असले तरी आशनाला तिच्या आजीने सांगितले होते की, तू ऑनलाइन क्लासेस घे आणि अभ्यासावर लक्ष दे.