Helmet Man : ९ वर्ष लोकांना फ्री हेल्मेट दिलं, स्वत:चं घरही विकलं; आता दागिन्यांवर घेतलं कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 01:30 PM2023-03-17T13:30:08+5:302023-03-17T13:33:28+5:30
गेल्या ९ वर्षांपासून ते हे काम करत असले तरी त्यांना कोणतंही आर्थिक पाठबळ मिळालेलं नाही. यापुढेही हे काम करणार असल्याचं ते म्हणतात.
राघवेंद्र बुधवारी लखनौ एक्सप्रेसवेवरून आपल्या कारमधून जात होते. त्यांच्या बाजूने एक दुचाकीस्वार सुस्साट वेगानं जाताना दिसला. त्याच्या बाईकचा वेग १०० किमी असेल पण डोक्यावर हेल्मेट नव्हतं. गाडीचा वेग वाढवून राघवेंद्र यांनी त्याला हाक मारली आणि थांबवलं.
राघवेंद्र यांनी दुचाकीवरून जाणाऱ्या विक्रम नावाच्या व्यक्तीला कारमधून बाहेर येत एक हेल्मेट दिले. हायवेवर हेल्मेटशिवाय दुचाकी चालवून जीव धोक्यात का घालत आहात? असा प्रश्न त्यांनी केला. त्यानंतर विक्रमनं हात जोडून राघवेंद्र यांचे आभार मानले आणि हेल्मेट घातले तो पुढे निघून गेला.
९ वर्षांपासून हेल्मेटचं वाटप
बुधवारी घडलेली ही पहिलीच घटना नाही. गेली ९ वर्षे राघवेंद्र अशाच प्रकारे देशभरात रस्त्यावर फिरत आहेत. हेल्मेटशिवाय कोणी दुचाकीवरून जाताना दिसलं की ते त्याला अडवतात. त्यानंतर त्याच्यासमोर हात जोडून त्याला आयुष्याचं महत्त्व समजावतात आणि आयुष्याला महत्त्व द्यायला सांगतात. त्यानंतर ते त्या व्यक्तीला हेल्मेट मोफत देतात.
घर विकून दिली हेल्मेट
ग्रेटर नोएडा येथील रहिवासी असलेले आणि हेल्मेट मॅन म्हणून ओळखले जाणारे राघवेंद्र कुमार यांनी आतापर्यंत ५६,००० हून अधिक हेल्मेट दिली आहेत. हे सर्व त्यांच्यासाठी सोपे नव्हते. या मोहिमेसाठी त्यांनी नोकरी सोडली. जमा झालेलं पैसेही संपले. यानंतर त्यांनी ग्रेटर नोएडा येथील घरही या कारणासाठी विकलं.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, घर विकून मिळालेल्या पैशातूनदेखील त्यांनी हेल्मेटचं वाटप केलंय. यानंतर त्यांनी आपल्या पत्नीच्या दागिन्यांवर कर्जही घेतलं आहे. आपल्याला आर्थिक पाठबळ मिळालेलं नाही. त्यामुळे त्यांना दु:ख तर वाटतं, पण आपण केलेल्या कृत्याबद्दल त्यांना कोणताही पश्चाताप नसल्याचंही अनेक रस्ते सुरक्षा अभियानांशी जोडलेले राघवेंद्र सांगतात.
गडकरींनीही केलं कौतुक
या मोहिमेबद्दल केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही राघवेंद्र यांचं कौतुक केलं आहे. राघवेंद्र यांनी २०१४ मध्ये आपला जिवलग मित्र कृष्णा याला एका रस्ता अपघातात गमावलं होतं. बाईक चालवताना त्यांनी हेल्मेट न घातल्यानं त्यांचा मृत्यू झाला होता.