चीनच्या मदतीने काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करू, फारुख अब्दुल्लांची मुक्ताफळं
By बाळकृष्ण परब | Published: October 11, 2020 04:58 PM2020-10-11T16:58:42+5:302020-10-11T17:09:36+5:30
Farooq Abdullah News : चीनच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागूल करण्यात येईल, असे विधान फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फ्रन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. चीनच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागूल करण्यात येईल, असे विधान फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे. कलम ३७० आणि कलम ३५ अ पुन्हा लागू करण्यासाठी आणि जम्मू काश्मीरला पुन्हा एकदा राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
यापूर्वी संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यानसुद्धा फारुख अब्दुल्ला यांना जम्मू-काश्मीरमध्ये पाच ऑगस्ट २०१९ पूर्वीची पूर्वस्थिती बहाल करण्यात यावी अशी मागणी केली होती. काश्मीरमध्ये जी परिस्थिती आहे. त्याविषयी बोलण्ययासाठी आम्ही संसदेत वेळ मागितली होती. मात्र आम्हाला वेळ देण्यात आला नाही. प्रत्यक्षात तेथील लोक कसे राहत आहेत. तेथील परिस्थिती कशी आहे. हा भाग देशातील इतर भागांसोबत पुढे जात आहे की पिछाडीवर पडलाय, हे कळणे महत्त्वाचे आहे, असे अब्दुल्ला म्हणाले होते.
काश्मीरमधील परिस्थिती अद्यापही सुधरलेली नाही. देशातील इतर भागात इंटरनेटची ४जी सेवा सुरू झालीय. ५जी येणार आहे. मात्र काश्मीरमध्ये अजूनही २जीवरच लोकांना काम चालवावे लागत आहे. अशामुळे तरुण कसे पुढे जातील. तेथील परिस्थितीबाबत आम्ही देशाला सांगू इच्छितोय, असे फारुख अब्दुल्ला त्यावेळी म्हणाले होते.