मणिपूरमध्ये मदत, बचावकार्याला वेग
By admin | Published: January 5, 2016 11:27 PM2016-01-05T23:27:24+5:302016-01-05T23:27:24+5:30
मणिपूरच्या भूकंपग्रस्त भागात मंगळवारी मदत आणि बचावकार्याला वेग देण्यात आला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी या भागाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
इंफाळ/ नवी दिल्ली : मणिपूरच्या भूकंपग्रस्त भागात मंगळवारी मदत आणि बचावकार्याला वेग देण्यात आला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी या भागाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. येथील नागरिकांमध्ये अद्यापही घबराटीचे वातावरण आहे. भूकंपामुळे या राज्यात अनेक इमारती कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आठजण मृत्युमुखी पडले.
गुवाहाटीहून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलांनी (एनडीआरएफ) इंफाळला धाव घेत मलबा हटविण्याच्या आणि त्याखाली दबलेल्या लोकांचा शोध घेण्याच्या कामाला वेग दिला. भूकंपाचे केंद्र असलेला तामेंग्लाँग आणि आसाममधील सीलचार भागात सर्वाधिक झळ पोहोचली आहे. अनेक सरकारी आणि खासगी विभाग मंगळवारी बंद ठेवण्यात आले. मणिपूर सचिवालय, इंफाळमधील आयएमए मार्केट भागातील अनेक इमारतींना तडे गेले असून काही शाळाही कोसळल्या आहेत. (वृत्तसंस्था)