मदत स्वेच्छेने आली पाहिजे, बळजबरीने नाही - मनोहर पर्रीकर
By admin | Published: October 25, 2016 01:43 PM2016-10-25T13:43:17+5:302016-10-25T13:43:17+5:30
एखाद्याच्या मानगुटीवर बसून बळजबरीने वसूल केलेल्या देणगीची भारतीय लष्कराला गरज नाही, मदत स्वच्छेने आली पाहिजे असं म्हणत मनोहर पर्रीकरांनी खडे बोल सुनावले आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चित्रपट निर्मात्यांसमोर सैनिक कल्याण निधीत पाच कोटी भरण्याची अट ठेवल्यावरुन राजकीय टीकास्त्र सुरु असताना केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनीदेखील आपलं मत व्यक्त केलं आहे. 'एखाद्याच्या मानगुटीवर बसून बळजबरीने वसूल केलेल्या देणगीची भारतीय लष्कराला गरज नाही, मदत स्वच्छेने आली पाहिजे,' असं म्हणत मनोहर पर्रीकरांनी खडे बोल सुनावले आहेत. भारतीय नौदलाच्या कमांडर कॉन्फरनसचं उद्घाटनावेळी पर्रिकर पत्रकार परिषदेत बोलत होते.
'उद्या एखाद्याला सैन्यासाठी निधी द्यायचा असेल, तर देऊ शकतो. मात्र, मदत ही ऐच्छिक असावी, कोणाच्या मानगुटीवर बसून जबरदस्तीने घेतलेल्या देणगीची सैन्याला गरज नाही,' असं मनोहर पर्रीकर बोलले आहेत. यावेळी बोलताना पर्रीकरांनी पाकिस्तानमधील क्वेटा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर दुख: व्यक्त केलं. तसंच दहशतवाद्यांचं समर्थन केल्यास दहशतवाद तुमच्यावर पलटू शकतो असं पाकिस्तानला सुनावलं आहे.
'ऐ दिल है मुश्किल' चित्रपट प्रदर्शित होऊ देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लष्कराला 5 कोटींची मदत देण्याच्या अट घातली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी निर्माते आणि राज ठाकरे यांच्यात मध्यस्थी केल्यामुळे त्यांच्याकडे वारंवार स्पष्टीकरण मागितल जात होतं. मात्र आपला ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपट प्रदर्शनाच्या मोबदल्यात 5 कोटींची मदत सैनिक कल्याण निधीला देण्याच्या प्रस्तावाला विरोध होता असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
मदत ऐच्छिक असावी तडजोडीसाठी नव्हे असंच माझं मत होतं. त्याबद्दलचं माझं मत मी राज ठाकरे यांच्यासमोरच व्यक्त केलं होतं. पण चित्रपट निर्मात्यांनी 5 कोटींची मदत देण्यास उत्सुक असल्याचं सांगितल्यानेच अखेर हा तोडगा काढला. शिवाय या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी विनंती केल्यानेच मी या वादात मध्यस्थी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना मनसेने विरोध केला होता. पाकिस्तानी कलाकार असलेला एकही चित्रपट रिलीज होऊ न देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. त्यामुळेच फवाद खान असलेल्या दिग्दर्शक करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाला मनसेने विरोध करत रिलीज होऊ न देण्याची धमकीच दिली होती. पण त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या सरकारी निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर या वादावर तोडगा काढण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी मांडवली केल्याची टीका करण्यात येत होती.