मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताच हेमंत सोरेन यांना अटक, झारखंडमध्ये राजकीय संकट, पुढे काय होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 05:23 AM2024-02-01T05:23:12+5:302024-02-01T05:24:11+5:30
Hemant Soren arrested: कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने हेमंत सोरेन यांच्यावर अखेर अटकेची कारवाई केली आहे. ईडीकडून अटकेच्या हालचाली सुरू झाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी राज्यपालांकडे जात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देऊन सोरेन हे घरी पोहोचताच ईडीने त्यांना अटक केली.
कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने हेमंत सोरेन यांच्यावर अखेर अटकेची कारवाई केली आहे. ईडीकडून अटकेच्या हालचाली सुरू झाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी राज्यपालांकडे जात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देऊन सोरेन हे घरी पोहोचताच ईडीने त्यांना अटक केली.
या सर्व घडामोडींमुळे झारखंडमध्ये राजकीय संकट उभे राहिले आहे. एकीकडे राज्यपाल सी.पी. राधाकृष्ण यांनी हेमंत सोरेन यांचा राजीनामा मंजूर केला आहे. मात्र नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला अद्याप परवानगी दिलेली नाही. हेमंत सोरेन हे राजीनामा देणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाने नवे मुख्यमंत्री म्हणून चंपई सोरेन यांचे नाव निश्चित केले. तसेच राज्यपालांकडे सरकार बनवण्यासाठीचा दावाही सादर केला होता. मात्र राज्यपालांनी नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.
दरम्यान, हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिला असला आणि राज्यपालांनी तो मंजूर केला असला तरी सध्या झारखंडच्या काळजीवाहू मुख्यमंत्रिपदी तेच आहेत. घटनात्मकदृष्ट्या हे पद रिक्त राहणे योग्य नसल्याने जोपर्यंत नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होत नाही, तोपर्यंत ते या पदावर राहतील.
बुधवारी झारखंडची राजधानी रांची येथे अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ईडीचं पथक रांची येथील हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी पोहोचलं. इथे कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी सोरेन यांच्या भूमिकेबाबत सुमारे ८ तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री ८.३० च्या सुमारास हेमंत सोरेन हे राजभवनामध्ये दाखल झाले. तसेच त्यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सादर केला. राज्यपालांनी त्वरित त्यांचा राजीनामा मंजूर केला. राजीनामा देऊन घरी पोहोचताच रात्री ९.३० च्या सुमारास ईडीने हेमंत सोरेन यांना अटक केली.