हेमंत सोरेन पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री, तुरुंगातून सुटल्यानंतर घेतली CM पदाची शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 06:07 PM2024-07-04T18:07:19+5:302024-07-04T18:08:20+5:30
Hemant Soren : राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी राजभवनात हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
रांची : झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) कार्याध्यक्ष हेमंत सोरेन यांनी गुरुवारी सायंकाळी येथील राजभवनात झारखंडचे १३ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी राजभवनात हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
चंपाई सोरेन यांनी बुधवारी राज्यपालांकडे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला होता. त्याचवेळी हेमंत सोरेन यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. तत्पूर्वी झालेल्या बैठकीत उपस्थित आघाडीच्या सर्व आमदारांनी एकमताने हेमंत सोरेन यांची नेतेपदी निवड केली होती. यानंतर राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी हेमंत सोरेन यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले आहे. गुरुवारी सायंकाळी येथील राजभवनात झारखंडचे १३ वे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांनी शपथ घेतली.
#WATCH | JMM executive president and former CM Hemant Soren takes oath as the Chief Minister of Jharkhand, at Raj Bhavan in Ranchi.
— ANI (@ANI) July 4, 2024
Governor CP Radhakrishnan administers him the oath to office. pic.twitter.com/b0LydgYuxb
दरम्यान, जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने हेमंत सोरेन यांना ३१ जानेवारी रोजी अटक केली होती. ईडीच्या ताब्यात असताना त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यानंतर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी चंपाई सोरेन यांच्याकडे देण्यात आली होती. यानंतर झारखंड उच्च न्यायालयाने २८ जूनला हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर केला होता. तरुंगातून जामिनावर बाहेर आल्यापासून सोरेन पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा हेमंत सोरेन यांची नियुक्ती झाली आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नेतृत्वातील फेरबदल महत्त्वाचे मानले जात आहेत.