'या' राज्य सरकारचे विद्यार्थिनींना खास गिफ्ट; दरमहा मिळतील १००० रुपये, असे असतील नियम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 13:50 IST2025-02-01T13:49:46+5:302025-02-01T13:50:33+5:30
अधिकाधिक मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे, हा या योजनेचा एक उद्देश आहे.

'या' राज्य सरकारचे विद्यार्थिनींना खास गिफ्ट; दरमहा मिळतील १००० रुपये, असे असतील नियम
सध्या देशातील अनेक राज्य सरकारांकडून महिलांसाठी विविध योजना आणल्या जात आहेत. झारखंड सरकार देखील राज्यातील महिला आणि मुलींसाठी योजना आणत आहे. झारखंडमधील सोरेन सरकार आधीच महत्त्वाकांक्षी मैया सन्मान योजनेअंतर्गत ५६ लाखांहून अधिक महिलांना दरमहा २५०० रुपयांची आर्थिक मदत करत आहे. आता सरकार राज्यातील मुलींना एक मोठी भेट देणार आहे.
महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना सरकार दरमहा १००० रुपये प्रवास भत्ता देणार आहे. नवीन शैक्षणिक सत्रापासून महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना दरमहा १००० रुपये प्रवास भत्ता सुरू करण्यात येणर आहे प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना या प्रवास भत्त्याचा लाभ मिळेल. सरकारचा उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग यासंबंधीच्या योजनेचा प्रस्ताव तयार करत आहे.
सरकार येत्या २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या शैक्षणिक सत्रापासून ही योजना लागू करण्याची तयारी करत आहे. प्रवास भत्ता योजनेअंतर्गत, महाविद्यालयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये शिकणाऱ्या जवळपास ७० ते ८० हजार विद्यार्थिनींना याचा लाभ घेता येईल. मात्र, ज्या विद्यार्थिनींची वर्गात हजेरी ७५ टक्के किंवा त्याहून अधिक आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. अधिकाधिक मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे, हा या योजनेचा एक उद्देश आहे.
१० फेब्रुवारी रोजी पोर्टल सुरू होणार
दरम्यान, शिक्षण विभाग शैक्षणिक सुविधांसाठी ६ पोर्टल सुरू करणार आहे. विद्यापीठात डिजिटल प्रशासन वाढविण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी एक पोर्टल तयार करण्यात आले आहे. यासोबतच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीसाठी एक पोर्टल असणार आहे. तसेच, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम पोर्टल, माणकी मुंडा शिष्यवृत्ती योजना पोर्टल, अप्रेंटिसशिप पोर्टल, खाजगी विद्यापीठ पोर्टल आणि नॉन-फायनान्स्ड ग्रँट पोर्टल तयार करण्यात आले आहे. १० फेब्रुवारीला रांची येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात हे सर्व पोर्टल लाँच केले जातील.