हेपेटायटिस-सी :लाखो नागरिकांची करणार काविळीसाठी मोफत तपासणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 01:03 AM2018-01-08T01:03:04+5:302018-01-08T01:03:27+5:30
सन २००२ पूर्वी ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असेल किंवा ज्यांनी कोणत्याही कारणाने रक्त संक्रमण करून घेतले असेल अशा नागरिकांना ‘हेपेटायटिस-सी’ या एक प्रकारच्या काविळसदृश आजाराची लागण झाली
नवी दिल्ली: सन २००२ पूर्वी ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असेल किंवा ज्यांनी कोणत्याही कारणाने रक्त संक्रमण करून घेतले असेल अशा नागरिकांना ‘हेपेटायटिस-सी’ या एक प्रकारच्या काविळसदृश आजाराची लागण झाली असण्याची शक्यता लक्षात घेऊन अशा सर्व नागरिकांची तपासणी करण्याची एक मोहीम केंद्र सरकार हाती घेणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने ही माहिती देताना सांगितले की, सन २००२ पूर्वी रक्तपेढयांमध्ये संकलित केल्या जाणाºया व तेथून पुरविल्या जाणाºया रक्ताचे या आजारासाठी ‘स्क्रीनिंग’ करण्याची काटेकोर व्यवस्था नव्हती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही तपासणी करण्यात येणार आहे.
या सूत्रांनुसार ज्यांची तपासणी केली जाणे अपेक्षित आहे अशा नागरिकांची संख्या ६० लाख ते १.२० कोटी या दरम्यान असण्याची शक्यता आहे. ही तपासणी मोहीम येत्या मार्चपासून सुरु केली जाईल.
ही तपासणी विनामूल्य केली जाईल व त्यात ज्यांना ‘हेपेटायटिस-सी’ची लागण झाल्याचे निष्पन्न होईल त्यांच्यावर उपचारही मोफत केले जातील, असे सांगून हा अधिकारी म्हणाला की, देशातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये ही तपासणी व उपचारांची सोय उपलब्ध करून दिली जाईल. शिवाय यासाठी १०० जादा विशेष केंद्रेही सुरु केली जातील.
या तपासाणीसाठी ज्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित केली जाईल त्यात सन २००२ पूर्वी शस्त्रक्रिया झालेले, रक्त संक्रमण करून घेतलेले, ज्यांना वारंवार रक्त ंसंक्रमण करून घ्यावे लागते असे, एचआयव्हीची लागण झालेले, ‘एसटीआय क्लिनिक्स’मध्ये काम करणारे यांचा समावेश
असेल.
या विशेष मोहिमेखेरीज नागरिकांनी वेळीच तपासणी करून उपचार करून घ्यावे व या आजारापासून होणारे मृत्यू व अस्वस्थता टळावी यासाठी सरकारने देशपातळीवर एक ‘हेपेटायटिस-सी अॅक्शन प्लॅन’ही तयार केला आहे.
वर्षाला सरासरी ३५ हजार मृत्यू-
पाणी व अन्नातून लागण होणारे ‘ए’ व ‘ई’
रक्तातून लागण होणारे ‘बी व ‘सी’
भारतात ‘हेपेटायटिस-सी’चे अंदाजे ६० लाख ते १.२० कोटी रुग्ण.
या आजाराने दरवर्षी सरासरी ३५ हजार मृत्यू
हेपेटायटिस-सी लक्षणे १० ते १२ वर्षांनीही दिसू शकतात.