रेल्वेच्या उत्पादन विभागाचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न, सोनिया गांधी यांचा लोकसभेत आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 05:25 AM2019-07-03T05:25:57+5:302019-07-03T05:30:02+5:30
लोकसभेत शून्य कालावधीत सोनिया गांधी यांनी प्रश्न उपस्थित करण्याचा हा दुर्मिळ प्रसंग होता.
नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालयाच्या उत्पादन विभागाच्या ‘कंपनीकरण’ करण्याच्या प्रस्तावाला संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी विरोध केला. गांधी यांचा मतदारसंघ रायबरेलीतील आधुनिक कोच (रेल्वेचे डबे) कारखान्याचेही कंपनीकरण केले जाणार असून, सरकारचा हा प्रयत्न खासगीकरणाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे, असा आरोप त्यांनी लोकसभेत केला. स्वत: गांधी यांनीच हा मुद्दा शून्य तासात उपस्थित केला होता. गांधी यांचा हा आरोप रेल्वे मंत्रालयाने फेटाळून लावताना कोच कारखाना हा सरकारच्याच नियंत्रणात राहील, असे म्हटले. रेल्वेच्या उत्पादन शाखांच्या कंपनीकरणाच्या प्रयत्नांवर टीका करताना सोनिया गांधी यांनी सरकार देशाची संपत्ती खासगी लोकांना कवड्याच्या भावात विकत आहे, असा आरोप केला.
देशाच्या संपत्तीची कवडीमोलाने विक्री
लोकसभेत शून्य कालावधीत सोनिया गांधी यांनी प्रश्न उपस्थित करण्याचा हा दुर्मिळ प्रसंग होता. ज्या लोकांना कंपनीकरणाचा खरा अर्थ समजत नाही त्यांच्यासाठी प्रत्यक्षात हे खासगीकरणाकडे टाकलेले पहिले पाऊल आहे. ते देशाची संपत्ती मूठभर खासगी लोकांना कवडीमोलाने विकत आहेत. यामुळे हजारो लोक बेरोजगार होतील, असे गांधी म्हणाल्या; परंतु रेल्वे मंत्रालयाने कंपनीकरण म्हणजे काही खासगीकरण नाही, असे स्पष्ट केले.