जाणून घ्या कशी ठरतात चक्रीवादळांची नावं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 06:51 PM2018-10-10T18:51:10+5:302018-10-10T18:52:19+5:30
या चक्रीवादळांची नावं कशी ठरतात यासंदर्भात जाणून घेऊयात...
भुवनेश्वर- बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं तितली या चक्रीवादळानं उग्ररूप धारण केलं आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, तितली हे चक्रीवादळ गुरुवारी 145 किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. तितली हे चक्रीवादळ भयंकर असून, ओडिशातल्या गोपाळपूरपासून हे चक्रीवादळ 370 किमी दूर आहे. बंगालच्या खाडीतील दक्षिण आणि पश्चिम मध्य क्षेत्राला या वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीचे तीन दिवस व त्या नंतरचे दोन दिवस म्हणजेच 5 दिवस या चक्रीवादळाचा परिणाम राहणार आहे. गोव्यावरही या चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 12 ऑक्टोबरपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
दुसऱ्या बाजूने अरबी समुद्रात उठलेल्या लुबान चक्रीवादळाची गतीही आता वाढून ताशी 110 किलोमीटरवर गेल्यामुळे त्याची तीव्रता वाढली आहे. परंतु ते येमेनच्या दिशेने सरकले असल्यामुळे लक्षद्वीप वगळता भारतावर फारसा परिणाम होणार नाही. तर तितली बंगालच्या उपसागरातून भारतीय भूभागात शिरत आहे. त्यामुळे लुबानपेक्षा तितली चक्रीवादळ अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. ब-याचदा या चक्रीवादळांची नावं उत्कंठा वाढवणारी असतात. जसे की, हुदहुद, लैला, निलोफर, वरदा इत्यादी. त्यामुळे या चक्रीवादळांची नावं कशी ठरतात यासंदर्भात जाणून घेऊयात...
कशी ठेवली जातात चक्रीवादळांना नावं?
अटलांटिक क्षेत्रातील चक्रीवादळांची नावं 1953पासून ठरण्यास सुरुवात झाली आहे. हिंद महासागर क्षेत्रातील आठ देशांनी भारताच्या मागणीनुसार या चक्रीवादळांचं 2004पासून नामकरण करण्याची व्यवस्था करून दिली. या आठ देशांमध्ये बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, थायलंड आणि श्रीलंकेचा समावेश आहे. प्रत्येक देशाने वादळासाठी प्रत्येकी 8, अशी 64 नावे ठरवून दिली आहेत. भारतानं अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर, वायू ही आठ नावं सुचवलेली होती. आतापर्यंत चक्रीवादळांची 64 नावे ठेवण्यात आली आहेत. भारताने एका चक्रीवादळाला 'लहर' हे नाव दिले होते.
कसे तयार होते चक्रीवादळ?
चक्रीवादळाचे शीतोष्ण आणि उष्ण असे दोन प्रकार असतात. जेव्हा शीत कटिबंधातून येणारी थंड हवा आणि उष्ण कटिबंधातून येणारी उष्ण हवा एकत्र होते, तेव्हा समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होतो, त्यालाच चक्रीवादळ असे संबोधले जाते. या वादळांचा फटका समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागाला जास्त बसतो.