इकडे सांगतायत महागाई कमी होतेय, तिकडे केंद्राच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढीचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 06:27 AM2023-08-07T06:27:14+5:302023-08-07T06:27:23+5:30
कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचा महागाई भत्ता दर महिन्याला कामगार ब्युरोकडून जारी करण्यात येणाऱ्या औद्योगिक कामगारांच्या उपभोक्ता मूल्य सूचकांच्या (सीपीआय-आयडबल्यू) आधारे निश्चित केला जातो.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्र सरकार आपल्या सेवेत असलेले एक कोटीहून कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांना वाढवून ४५ टक्के इतका करण्याच्या विचारात आहे. कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचा महागाई भत्ता दर महिन्याला कामगार ब्युरोकडून जारी करण्यात येणाऱ्या औद्योगिक कामगारांच्या उपभोक्ता मूल्य सूचकांच्या (सीपीआय-आयडबल्यू) आधारे निश्चित केला जातो.
ऑल इंडिया रेल्वेमेन फेडरेशनचे महासचिव शिव गोपाल मिश्रा यांनी सांगितले की, जून २०२३ साठीचा सीपीआय-आयडबल्यू ३१ जुलै रोजी जारी करण्यात आला आहे. आम्ही महागाई भत्त्यात चार टक्के वाढीची मागणी केली होती; परंतु, सरकारकडून यात तीन टक्केची वाढ केली जाण्याची शक्यता आहे.
मिश्रा म्हणाले की, आर्थिक मंत्रालयाचा व्यय विभाग लवकरच महागाई भत्ता वाढीबाबतचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवणार आहे. वाढीव महागाई भत्ता १ जुलैपासून लागू होईल. २४ मार्च २०२३ रोजी महागाई भत्त्यात केलेली वाढ १ जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात आली होती.