येथे महिला नाही तर पुरुष साडी नेसून करतात देवीची पूजा, २२९ वर्षांपासून सुरू आहे प्रथा, असा आहे इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 08:25 PM2021-11-15T20:25:02+5:302021-11-15T20:30:42+5:30
West Bengal News: येथे १३ पुरुषांनी साडी नेसून डोक्यावर पदर घेऊन आई जगधात्रीची पूजा केली. हे दृष्य पाहण्यासाठी मंडप परिसराच्या आत आणि बाहेर शेकडो भाविक उपस्थित होते.
हुगळी - पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील चंदननगर येथे अदभूत जगधात्री पूजेचे आयोजन होते. बांगला संस्कृतीमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या देवी वरण परंपरेच्या विरुद्ध रविवारी विसर्जनाच्या दिवशी आई जगधात्रीची कुंकू आणि पानाच्या माध्यमातून पूजा महिलांनी नाही तर पुरुषांनी साडी परिधान करून केली. येथे १३ पुरुषांनी साडी नेसून डोक्यावर पदर घेऊन आई जगधात्रीची पूजा केली. हे दृष्य पाहण्यासाठी मंडप परिसराच्या आत आणि बाहेर शेकडो भाविक उपस्थित होते.
याबाबत पूजा समितीचे संरक्षक श्रीकांत मंडल यांनी सांगितले की, इंग्रजांच्या काळात आजपासून २९ वर्षांपूर्वी संध्याकाळ झाल्यानंतर महिला भीतीमुळे घराबाहेर पडत नसत. तेव्हा ही पूजा आयोजित करणाऱ्या पूर्वजांनी स्वत: साडी नेसून आई जगधात्रीची पूजा करण्याची परंपरा पूर्ण केली. तेव्हापासून सुरू झालेली ही परंपरा आजही कायम आहे.
पूजा समितीचे संचालक सांगतात की, आजपासून सुमारे २५० वर्षांपूर्वी बंगालचे राजा कृष्णचंद्र दिवाण दाताराम सूर यांच्या मुलगीचे घर चंदननगरमधील गौरहाटी येछे होते. तिथे आई जगधात्रीची उपासना होत असे. नंतर आर्थिक चणचणीमुळे राजाच्या मुलीने ही पूजा जगधात्री पूजेच्या रूपामध्ये परिसरातील लोकांकडे हस्तांतरित केले.
त्यावेळी राजा आणि जमिनदारांच्या कुटुंबांमध्ये महिलांसाठी पडदा प्रथा प्रचलित होती. कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी महिलांना परवानगी दिली जात नव्हती. त्याबरोबरच इंग्रजांच्या राज्याचीही महिलांमध्ये भीती होती. त्यामुळेच चंदननगरच्या गौरहाटीच्या राजघराण्यामध्ये आई जगधात्रीच्या विसर्जनादिवशी पुरुषांनी साडी परिधान करून आपल्या डोक्यावर पदर घेऊन आई जगधात्रीच्या पूजेची प्रक्रिया सुरू करण्याचा विडा उचलला. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे.