अरेरे केजरीवाल... तुम्ही पण गुंतलात फोडाफोडीच्या राजकारणात - स्टिंग ऑपरेशन

By Admin | Published: March 11, 2015 02:50 PM2015-03-11T14:50:15+5:302015-03-11T15:13:55+5:30

अरविंद केजरीवाल काँग्रेसला फोडण्याचं राजकारण करत असल्याचं एका ऑडियो रेकॉर्डिंगमध्ये आढळलं आहे.

Hey Kejriwal ... you have got involved in the politics of ruckus - sting operation | अरेरे केजरीवाल... तुम्ही पण गुंतलात फोडाफोडीच्या राजकारणात - स्टिंग ऑपरेशन

अरेरे केजरीवाल... तुम्ही पण गुंतलात फोडाफोडीच्या राजकारणात - स्टिंग ऑपरेशन

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - परंपरागत राजकारणाच्या दलदलीपेक्षा सर्वसामान्य व प्रामाणिक लोकांना राजकारणात आणण्याचा दावा करणारे अरविंद केजरीवाल काँग्रेसला फोडण्याचं राजकारण करत असल्याचं एका ऑडियो रेकॉर्डिंगमध्ये आढळलं आहे. विशेष म्हणजे मोबाईलमधलं हे रेकॉर्डिंग राजेश गर्ग या आम आदमी पार्टीच्या माजी आमदाराशी झालं असून त्यांनी हे रेकॉर्डिंग खरं असल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे केजरीवाल यांच्यात व अन्य पक्षांच्या नेत्यांमध्ये काय फरक आहे असा सवालही उपस्थित झाला आहे. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्यानंतर दिल्लीमध्ये पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी केजरीवाल यांनी जुळवाजुळव सुरू केली होती. त्यामुळे, काँग्रेसचे सहा आमदार फोडायला सांगताना केजरीवाल यांनी यामध्ये तीन आमदार मुसलमान आहेत त्यामुळे ते भाजपाला पाठिंबा देणार नाहीत असे सांगितल्याचे ऐकायला येत आहे. त्यामुळे तीन मुस्लीम आमदारांना काँग्रेसपासून फोडलं तर ते आपला पाठिंबा देतील असे स्पष्ट धार्मिक राजकारण करत आपण यातही मागे नसल्याचे केजरीवाल यांनी दाखवून दिले आहे.
आम आदमी पार्टीला दिल्ली विधानसभेत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर स्थिरस्थावर होण्यापूर्वीच धक्के बसायला सुरूवात झाली आहे. आधी योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांनी केजरीवाल यांच्याविरोधात टाकलेले पाउल आणि आता गर्ग यांनी उघड केलेले हे ऑडियो रेकॉर्डिंग यामुळे आपच्या पुढील आडचणी वाढण्याची शक्यता आहे.
हे सगळे खरे असेल तर सर्वसामान्य माणसांचा पक्ष आणि अत्यंत स्वच्छ चारीत्र्याचे व काँग्रेसच्या व भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणाला पर्याय देणारे केजरीवाल यांच्या प्रतिमेला चांगलाच धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपा व काँग्रेसवर घोडेबाजाराच आरोप केजरीवाल यांनी वारंवार केला होता. या पार्श्वभूमीवर केजरीवाल स्वत:च अशा कारवायांमध्ये गुंतले असतील तर ते आपली बाजू कशी मांडतात हे बघणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, हे ऑडियो रेकॉर्डिंग बनावट असल्याचा दावा आपच्या नेत्यांनी केला आहे. या सगळ्यात भर म्हणून आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्रातल्या नेत्या अंजली दमानिया यांनी आप सोडत असल्याचं जाहीर केलं आहे. मी अरविंद केजरीवाल यांना तत्वांसाठी पाठिंबा दिला होता, घोडेबाजारासारख्या मूर्खपणासाठी नाही अशी टिप्पणी करत दमानिया यांनी ट्विटरवर आम आदमी पार्टी सोडत असल्याचं जाहीर केलं आहे. आपला महाराष्ट्रात हा चांगलाच धक्का असल्याचं मानण्यात येत आहे.

Web Title: Hey Kejriwal ... you have got involved in the politics of ruckus - sting operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.