हाय अॅलर्ट ! देशात घुसले 25 दहशतवादी, 26/11सारखा हल्ला करण्याचा कट
By admin | Published: May 30, 2017 12:29 PM2017-05-30T12:29:34+5:302017-05-30T12:29:34+5:30
लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेकडून देशात 26/11 मुंबई हल्ल्याप्रमाणे घातपात करण्याचा मोठा कट रचला जात आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - सीमा रेषेवर घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना 27 मे रोजी यमसदनी धाडले. काश्मीर खोऱ्यात 24 तासांत तीन वेगवेगळ्या चकमकींमध्ये 10 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले, त्यात गेल्या वर्षी चकमकीत ठार झालेल्या बुरहान वानीची साथीदार व हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सबजार अहमद भट्ट हाही ठार झाला होता.
यामुळे बिथरलेल्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेकडून देशात 26/11 मुंबई हल्ल्याप्रमाणे घातपात करण्याचा मोठा कट रचला जात आहे. गुप्तचर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तोयबाचे जवळपास 20 ते 25 दहशतवादी मोठा रक्तपात घडवण्यासाठी देशात घुसले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांकडून रेल्वे स्टेशन, विमानतळ, हॉटेल, पर्यटन स्थळं आणि मॉल्स यांसारख्या गजबजलेल्या ठिकाणांना टार्गेट केले जाण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांकडून सर्व रेल्वे स्टेशन आणि विमानतळांवर हायअॅलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तान सीमेशेजारी असणा-या राज्यांतही सुरक्षा यंत्रणांनी सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे.
गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या संदेशानुसार, सर्व सुरक्षा दलांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पाकिस्तानमधील ""लष्कर ए तोयबा""चे दहशतवादी दिल्ली व मुंबईमध्ये किंवा पंजाब आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागात हल्ला करू शकतात, असा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला आहे. तोयबाचे २० ते २१ हस्तक भारतात असावेत. दहशतवादी आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणण्याची भीतीही व्यक्त होत आहे.