महागाई रोखण्यासाठी ‘हायटेक’ उपाय; मोबाइल अॅप्लिकेशन विकसित करणार
By admin | Published: September 23, 2016 01:53 AM2016-09-23T01:53:27+5:302016-09-23T01:53:27+5:30
महागाईला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकार आता ‘हायटेक’ पद्धतीचा अवलंब करण्याच्या तयारीत असून, यासाठी एक मोबाइल अॅप्लिकेशन विकसित केले जाणार आहे.
नितीन अग्रवाल , नवी दिल्ली
महागाईला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकार आता ‘हायटेक’ पद्धतीचा अवलंब करण्याच्या तयारीत असून, यासाठी एक मोबाइल अॅप्लिकेशन विकसित केले जाणार आहे. यामार्फत ग्राहकांना जादा किंमत वसूल करणाऱ्यांविरुद्ध थेट केंद्र सरकारकडे तक्रार करता येईल.
अन्न आणि ग्राहक कल्याण मंत्रालयाने यासाठी मोबाइल अॅप विकसित करण्याचे निर्देश दिले असून, लवकरच हे अॅप ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.या मोबाइल अॅप्लिकेशनचे वैशिष्ट्य असे की, यामार्फत ग्राहकांना थेट मंत्रालयाशी संपर्क साधता येईल. तसेच ग्राहकांना आवश्यक अन्नपदार्थांच्या किरकोळ मूल्याबाबत अद्ययावत माहिती दिली जाईल. एखाद्या दुकानदाराविरुद्ध जादा किंमत वसूल केल्याची तक्रार आल्यास त्यावर तत्काळ कारवाई केली जाईल. तक्रारी प्राप्त होणे आणि त्याच्या प्रोसेसिंगसाठी कमी वेळ लागेल.
सुरुवातीला हे अॅप्लिकेशन राजधानी दिल्लीतील ग्राहकांपुरतेच उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानंतर इतर मोठ्या आणि छोट्या शहरांतही उपलब्ध करून दिले जाईल. महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी ग्राहक कल्याण मंत्रालयाने एक समिती स्थापन केली होती. मंगळवारी या समितीच्या बैठकीत महागाईला कसा आळा घालता येईल, यावर व्यापक चर्चा केली. चर्चेअंती मोबाइल अॅप्लिकेशन विकसित करण्याची शिफारस मंजूर करण्यात आली. त्यानुसार मोबाइल अॅप्लिकेशन विकसित करण्याचे निर्देश जारी करण्यात आले.
याआधी केंद्र सरकारने सर्व राज्यांना आवश्यक वस्तू अधिनियमन कायद्यात सुधारणा करून किरकोळ किमती निश्चित करण्याचे निर्देश दिले होते. जेणेकरून ठोक आणि किरकोळ दरातील तफावत मर्यादित करता यावी. याशिवाय डाळींचे भाव आटोक्यात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डाळींची आयात करण्यात आली. तसेच साठेबाजांविरुद्ध कारवाईही करण्यात आली. एवढे प्रयत्न करूनही जनता महागाईने त्रस्त होती.