संघाचे मुख्यालय होणार हायटेक
By admin | Published: September 6, 2016 03:46 AM2016-09-06T03:46:32+5:302016-09-06T03:46:32+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघही काळाबरोबर बदलू पाहत आहे.
नितीन अग्रवाल,
नवी दिल्ली- राष्ट्रीय स्वयंसेवक संघही काळाबरोबर बदलू पाहत आहे. दिल्लीतील केशवकुंज या कार्यालयाचे भव्य इमारतीत रूपांतर करण्याची तयारी सुरू झाली आहे. अर्थातचे हे नवे कार्यालय हायटेक असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ आॅक्टोबर रोजी नव्या इमारतीचे भूमिपूजन होणार आहे.
संघाने नव्या गणवेशासाठीही विजयादशमीचाच मुहूर्त निश्चित केला आहे. विजयादशमीला नागपुरात कार्यक्रम असतात, त्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती राहण्याची शक्यता कमी आहे; पण भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी संघाचे सह कार्यवाह भैयाजी जोशी उपस्थित राहणार आहेत. संघाच्या या नव्या इमारतीत आधुनिक ग्रंथालय, मीडिया आणि सभागृह असणार आहे. संघाशी संबंधित सर्व संस्थांना केशवकुंजमध्ये समाविष्ट करून घेण्यात येईल. यात प्रामुख्याने संघाचे मुखपत्र पांचजन्य आणि आॅर्गनायझर हे प्रकाशन, सुरुचि प्रकाशन, संस्कृतभारती, सेवाभारती, भारतीय इतिहास संकलन समिती यांचा समावेश आहे. याशिवाय संघाच्या आंतरराष्ट्रीय विभागाशी संबंधित संघटनांनाही येथे जागा असेल.
गडकरी यांच्या काळातील योजना
असे सांगितले जाते की, नितीन गडकरी हे भाजपाध्यक्ष असताना त्यांनी केशवकुंजच्या नव्या इमारतीसाठी प्रस्ताव दिला होता. याला नागपूर मुख्यालयातून मान्यता मिळाली होती.
>झपाट्याने झाला विस्तार
संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांना समर्पित हे दिल्लीतील मुख्यालय पाच दशकांहून अधिक काळापासून येथे आहे. अडीच एकरांत याचा विस्तार आहे. संघटनेचा विस्तार आणि मजबुती यासाठी आधुनिकीकरणावरही भर दिला जात आहे. पुण्यात १९२५ मध्ये स्थापन झालेल्या संघाने गत काही वर्षांत वेगाने प्रगती केली आहे. २०१० मध्ये ४० हजार शाखा असलेल्या संघाच्या आता ५७ हजार शाखा आहेत.