नमस्ते ट्रम्प : अहमदाबादेत फक्त व्हीव्हीआयपी विमानांना परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 06:16 AM2020-02-19T06:16:18+5:302020-02-19T06:16:44+5:30
६० विमानांचे वेळापत्रक बदलले : २२ कि.मी.चा रोड शो, १ लाख लोक निमंत्रित
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २४ फेब्रुवारी रोजी गुजरातमध्ये दाखल होत आहेत. यादिवशी किमान ६० आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणांचे नव्याने वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्हीव्हीआयपींच्या केवळ १० विमानांना परवानगी देण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, अमेरिकी अध्यक्षांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध एजन्सींशी समन्वय केला जात आहे. काही उड्डाणे बडोदा आणि सुरतसाठी वळविण्यात आली आहेत. अमेरिकी हवाईदलाचे एक विमान अगोदरच अहमदाबाद विमानतळावर उतरले आहे. सोबत एक सुरक्षा कार, टेहळणी करणारा एक कॅमेरा आणि अन्य सुरक्षा उपकरणे आहेत. ट्रम्प हे अहमदाबादहून दिल्लीला जाईपर्यंत ही यंत्रणा येथेच असणार आहे. अहमदाबादच्या भव्य मोटेरा स्टेडियमवर ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम होणार आहे.
२२ कि.मी.च्या रोड शोसाठी रस्त्यांचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. यासाठी ३० कोटी रुपये खर्च होणार आहे. नागरिकांना मोटेरा स्टेडियमकडे नेण्यासाठी २,२०० एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. एक महिला आयपीएस अधिकारी या मेलानिया ट्रम्प यांच्याशी समन्वय करतील. अमेरिकेचे जवळपास ३० सुरक्षा कर्मचारी अगोदरच अहमदाबादमध्ये दाखल झालेले आहेत. ट्रम्प यांच्या रोड शोदरम्यान त्यांच्या ताफ्यात जवळपास ५० कार असणार आहेत. मोटेरा स्टेडियमवर एक लाख नागरिक निमंत्रित आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी भारतात येत आहेत. अहमदाबादमध्ये त्यांच्या स्वागतासाठी असे होर्डिंग्ज लागले आहेत.
(दुसºया छायाचित्रात) डोनाल्ड ट्रम्प हे आग्रा येथील ताजमहलला भेट देणार आहेत. तत्पूर्वी, अमेरिकेच्या सुरक्षारक्षकांनी सीआयएसएफ आणि एएसआय कर्मचाऱ्यांसोबत मंगळवारी ताज महल परिसरात भेट देऊन पाहणी केली.
आग्रामध्ये सुरक्षा वाढविली
च्अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारी रोजी भारतात दाखल होत आहेत. यावेळी ते गुजरातमधील अहमदाबाद ते उत्तर प्रदेशातील आग्रा या भागाला भेटी देणार आहेत.
च्यासाठी आग्रामध्ये सुरक्षा व्यवस्था प्रचंड वाढविण्यात आली आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या सुरक्षेचा सातत्याने आढावा घेत आहेत.
च्सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी जवळपास ५ हजार पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. गुप्तचर विभाग आणि अन्य विभागाचे २०० अधिकारी शहरात डेरेदाखल होत आहेत.