काश्मिरात घरोघरी लपलेले दहशतवादी आता लष्कराच्या "रडार"वर
By Admin | Published: June 11, 2017 10:58 AM2017-06-11T10:58:00+5:302017-06-11T10:58:00+5:30
लष्कर काश्मीरमधल्या घरात दडून बसलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी नवी रणनीती आखत आहे.
ऑनलाइन लोकमत
जम्मू-काश्मीर, दि. 11 - गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. घराघरात लपून बसलेले दहशतवादी अचानकपणे जवानांवर हल्ले करत होते. मात्र लपून बसलेल्या दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी जवानांनी नवी शक्कल लढवली आहे. भारतीय लष्कर काश्मीरमधल्या घरात दडून बसलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी नवी रणनीती आखत आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, लष्कर सर्च ऑपरेशनदरम्यान जिहादी आणि दहशतवाद्यांना पकडण्यासाठी नव्या रडार सिस्टीमचा वापर करणार असून, हे रडार घर आणि भिंतीच्या आरपार प्रवेश करण्यात सक्षम आहे. एका लष्करी अधिका-यानं सांगितलं की, या रडार सिस्टीमला अमेरिका आणि इज्रायलकडून मागवण्यात आलं आहे. हे रडार सिस्टीम जवानांना दहशतवाद्यांचं लोकेशन ट्रेस करण्यासाठी मदत करणार आहे. जे अंडरग्राऊंड राहून काम करतात. अधिका-यांच्या मते, काही जवान या रडार सिस्टीमचा वापर काश्मीरमध्ये करत आहेत.
भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीरच्या पोलिसांच्या ज्वाइंट ऑपरेशनमध्ये मिळालेल्या अपयशामुळे या रडारची गरज भासली आहे. आता ज्वाइंट ऑपरेशनच्या माध्यमातून पोलीस आणि जवान लपलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढू शकणार आहेत. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, काही दहशतवादी काश्मीरमधील घरांमध्ये लपून दहशतवाद पसरवण्याचं काम करत आहेत. त्यानंतर लष्करानं हे ज्वाइंट ऑपरेशन राबवलं आहे.