दिल्ली व परिसरात हाय अॅलर्ट घोषित
By admin | Published: October 2, 2016 02:43 AM2016-10-02T02:43:50+5:302016-10-02T02:43:50+5:30
पाकव्याप्त काश्मीरमधे भारतीय सैन्य दलाने यशस्वी सर्जिकल स्ट्राइक्स केल्यानंतर नवरात्र व दिवाळीत दिल्ली व परिसरात विपरित घटना घडू नये, यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने
- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
पाकव्याप्त काश्मीरमधे भारतीय सैन्य दलाने यशस्वी सर्जिकल स्ट्राइक्स केल्यानंतर नवरात्र व दिवाळीत दिल्ली व परिसरात विपरित घटना घडू नये, यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने हाय अॅलर्ट जारी केला असून, गर्दीची ठिकाणे, प्रमुख इमारती, मंदिरे व प्रार्थना स्थळांची सुरक्षा वाढवली आहे.
सर्जिकल स्ट्राइक्सनंतर इंटेलिजन्स ब्युरोचे दिल्ली व परिसरातून होणाऱ्या तमाम फोन कॉल्सकडे लक्ष होते. आयबीच्या अहवालानुसार, सर्जिकल स्ट्राइक्सनंतर दहशतवादी खवळले असून, दिल्ली व परिसरावर त्यांची नजर आहे. दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा त्यांचा इरादा असेल. त्यामुळे राजधानी व परिसरातील बस स्टँड्स, रेल्वे स्थानके, दोन्ही विमानतळे, बाजारपेठा व प्रमुख इमारतींची सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे आदेश दिले आहेत. नवरात्र व दिवाळीत दिल्लीच्या बाजारपेठांमध्ये गर्दी असते. दहशतवादी गट अशाच ठिकाणांना लक्ष्य बनवण्याचा प्रयत्न करतात, असा पूर्वाअनुभव आहे.
दिल्लीत दिवाळीत, २९ आॅक्टोबर २00५ साली लष्कर ए तोयबाने पहाडगंज, सरोजिनीनगर मार्केट व गोविंदपुरीत ३ बॉम्बहल्ले घडवले. त्यात ६२ लोक ठार, तर २१0 लोक गंभीर जखमी झाले होते. अशा हल्ल्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कडक सुरक्षेचे आदेश दिले आहेत.