उत्तर प्रदेशातील महत्त्वाची ठिकाणे उडवण्याची धमकी, राज्यात हाय अॅलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 11:35 PM2018-06-06T23:35:19+5:302018-06-06T23:35:19+5:30
मथुरा व वाराणसीमधील मंदिरे तसेच अनेक धार्मिक स्थळे व रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने दिल्यामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशात हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
लखनौ : मथुरा व वाराणसीमधील मंदिरे तसेच अनेक धार्मिक स्थळे व रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने दिल्यामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशात हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. या संघटनेने ६, ८ व १० जून रोजी या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी पत्राद्वारे दिल्याने खळबळ माजली आहे.
लष्कर-ए-तोयबाच्या जम्मू-काश्मीरचा कमांडर मौलाना अंबू शेख याने हे पत्र लिहिले असून, त्यातील धमकीमुळे इंटलिजन्स ब्युरोने
लगेचच अॅलर्ट जारी केला.
उत्तर प्रदेश पोलिसांनीही धमकीची गंभीर दखल घेऊ न, राज्यभरातील सर्व धार्मिक व पर्यटन स्थळे तसेच महत्त्वाची रेल्वे स्टेशन आणि सार्वजनिक तसेच रहदारीच्या ठिकाणी सुरक्षेत वाढ केली आहे.
सहारणपूर व हापूड या
स्टेशनांवर लगेचच प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ती दोन्ही
स्टेशन आज, म्हणजे ६ जून रोजी उडवण्यात येतील, अशी धमकी
त्या पत्रात आहे.
इंटलिजन्स ब्युरोने २ जून रोजी उत्तर प्रदेशच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून, या धमकीची माहिती दिली होती. त्यात नवी दिल्ली स्टेशनवर मिळालेल्या पत्राचा उल्लेख आहे. ते पत्र लश्कर-ए-तोयबाचे होते. अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक आनंद कुमार यांनी या पत्राची सत्यता आम्ही तपासत आहोत, असे सांगितले. (वृत्तसंस्था)
कसून तपासणी
मथुरेतील बांके बिहारी
मंदिर आणि श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर, वाराणसीचे काशी विश्वनाथ मंदिर तसेच या दोन्ही रेल्वे स्टेशनांच्या परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
रेल्वे स्टेशनांवर तसेच मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी करण्यात येत आहे.